नांदेड : प्रतिनिधी
लघुलेखक पद रद्द करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या युवक-विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी अंत्ययात्रेची प्रतीकात्मक आरती सजवून त्याभोवती आक्रोश व्यक्त करीत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. या आंदोलनामुळे लघुलेखक पद रद्द करण्याच्या निर्णयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी वषार्नुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यात लघुलेखक पदासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करणा-या उमेदवारांची संख्याही मोठी आहे. मात्र अचानक हे पद रद्द केल्याने तयारी करणा-या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आपल्या मेहनतीचे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचे काय होणार, असा सवाल आंदोलक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आंदोलनाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक अर्थी सजवून लघुलेखक पदाचे भवितव्य संपवले, अशा भावनिक पद्धतीने आपला संताप व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी रडत-रडत शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली. आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासन आणि शासनाचे लक्ष आपल्या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला.
लघुलेखक पद पुन्हा सुरू करावे, रिक्त पदांची भरती करावी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची गांभीयार्ने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.लघुलेखक पदाबाबत शासन नेमकी कोणती भूमिका घेणार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार? याकडे आता नांदेडमधील स्पर्धा परीक्षा देणा-या युवकांचे लक्ष लागले आहे.
















