30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीय विशेषलसीच्या दुष्परिणामांचं भूत

लसीच्या दुष्परिणामांचं भूत

कोव्हिशिल्ड लस बनवणारी कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटिश न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये लशीमुळे ब्लड क्लॉटिंग म्हणजेच रक्तात गाठी होण्याची शक्यता असल्याचे मान्य केले. यानंतर एकच गदारोळ निर्माण झाला. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या या कबुलीजबाबाने जगात दहशत निर्माण झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्यांनी कोव्हिशिल्ड घेतली त्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. वास्तविक भारतात तिशी-चाळीशीतील व्यक्तींच्या अकाली निधनामुळे हा मुद्दा मध्यंतरीच्या काळात प्रकर्षाने चर्चेत आला होता. लसीचा आणि या मृत्यूंचा संबंध नसल्याचे सरकारकडून स्पष्ट केले गेले; पण अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या खुलाशानंतर याबाबत नव्याने परीक्षण करण्याची गरज निर्माण जाली आहे.

कोरोना लस निर्माण करणा-या अ‍ॅस्ट्राझेनिकाने लशीच्या दुष्परिणामावरून न्यायालयात दिलेली कबुली पाहता जगभरात एकच खळबळ उडाली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. भारतातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना काळानंतर अशा काही घटना घडल्या की तंदुरुस्त आणि कमी वयाच्या लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका येण्यास सुरुवात झाली. मग सांस्कृतिक व्यासपीठ असो, लग्न सोहळा असो, पार्टी असो यादरम्यान मौजमजा करताना अचानक चक्कर येणे आणि त्यानंतर तात्काळ मृत्यू होण्याच्या घटना उघडकीस आल्या. विशेष म्हणजे सुमारे दोन-तीन वर्षांत अशाप्रकारे होणा-या मृत्यूंनी एकप्रकारे गूढ रुप धारण केले आहे. आता अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कबुलीने तर परिस्थिती आणखीच चिघळली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, काही तरुणांना हृदयविकाराचा झटका येणे आणि मृत्यू होणे यासारख्या घटना कोव्हिशिल्डच्या दुष्परिणामामुळे होत आहेत; पण हे सत्य आहे की संभ्रम निर्माण करणारे, हे कोणालाही ठोसपणे सांगता येणार नाही. कोव्हिशिल्ड कंपनीच्या खुलाशानंतर भविष्यात लसधारकांना दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार, अशी भीती निर्माण झाली आहे. ही लस वापरण्याचा आकडा पाहिला तर भारतात एक अब्ज १७ कोटी डोस देण्यात आले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी कोव्हिशिल्डची लस घेतली असून संपूर्ण जगाचा विचार केला तर ही संख्या ३ अब्जपर्यंत पोहोचू शकते.

कोव्हिशिल्ड लस बनवणारी कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटिश न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये लशीमुळे ब्लड क्लॉटिंग म्हणजेच रक्तात गाठी होण्याची शक्यता असल्याचे मान्य केले. यानंतर एकच गदारोळ निर्माण झाला. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या या कबुलीजबाबाने जगात दहशत निर्माण झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्यांनी कोव्हिशिल्ड घेतली त्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे; परंतु भारतातील लोकांना घाबरण्याची गरज नाही. कारण भारतीय आरोग्य व्यवस्थेने असे दुष्परिणाम आपल्याकडे दिसत नसल्याचे सांगितले आहे. सध्या लस सुरक्षित असून त्याचे दुष्परिणाम दिसून आले तरी आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे तसेच सरकारकडूनदेखील हीच बाब सांगितली गेली आहे तरीही लोकांच्या मनातील भीती दूर होताना दिसत नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत.

कोरोना प्रतिबंधक लशीच्या दुष्परिणामावरून जगात खळबळ उडालेली असताना अ‍ॅस्ट्राझेनेकाचे प्रकरण न्यायालयात कसे पोहोचले? हे पाहणेदेखील गरजेचे आहे. ब्रिटिश नागरिक जॅमी स्कॉन यांनी अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. त्यांनी एप्रिल २०२१ मध्ये कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर त्यांच्या मेंदूला कायमस्वरुपी इजा झाली. जेम स्कॉटसह अनेक जण थ्रोम्बोसिस नावाच्या दुर्मिळ आजाराने बाधित झाले. त्याच वेळी सर्वांनी एकत्र येऊन कंपनीविरुद्ध न्यायालयात खटला भरला. त्यानंतर न्यायालयात या दिग्गज औषधी कंपनीने लशीमुळे निर्माण होत असलेल्या गंभीर आरोग्य समस्येचा मुद्दा मान्य केला.

न्यायालयाने कंपनीला पीडित लोकांना १० कोटी पौंड दंड भरण्याचा आदेशदेखील दिला. या खुलाशानंतर कोरोनाच्या अन्य लशी फायझर, मॉडर्ना यांच्या बाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कंपन्या तत्कालिन काळात भारतात सक्रिय होत्या आणि त्यांनाही आपल्या लशीसंदर्भात उत्तर द्यावे लागेल. कारण जागतिक पातळीवर हा मुद्दा संवेदनशील बनला आहे. जेव्हा कोरोनाने जगभरात थैमान घातले होते आणि जग त्याच्या विळख्यात अडकले तेव्हा कोव्हिशिल्ड लशीला ऑक्सफर्ड विद्यापीठाने परवानगी दिली. या लशीला कोव्हिशिल्ड हे नाव भारतानेच दिले आहे आणि ही बाब फार कमी जणांना ठाऊक आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका व्हॅक्सिन जोब्रिया लशीची निर्मिती ही भारतात औषधी कंपनी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया म्हणजेच ‘एआयआय’ने आपल्या पातळीवर केली. लस झाल्यानंतर त्याची कायदेशीररित्या चाचणी घेण्यात आली. सर्वात अगोदर उंदरांवर प्रयोग केला गेला. त्यानंतर एखाद्या दुस-या गंभीर रुग्णांवर त्याचा प्रयोग केला.

त्याचे परिणाम चांगले आले त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली. भारतीय शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या संयुक्त पॅनेलच्या देखरेखीखाली त्याची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतरच ही लस रुग्णांना देण्यास सुरुवात झाली; परंतु ब्रिटनमध्ये कायद्याचे पालन न करता आणि चाचणी न घेता घाईगडबडीत कोव्हिशिल्डची लस देण्यात सुरुवात झाली होती. हा मुद्दा ब्रिटन सरकारने न्यायालयात मान्य केला आहे त्यामुळे अ‍ॅस्ट्राझेनेकाचे म्हणणे न्यायालयात सत्य असल्याचे वाटते. ही लस दुर्मिळ आजार समजला जाणारा टीटीएसला कारणीभूत ठरू शकते, असे म्हटले जात आहे. डॉक्टरांच्या मते, या लशीची दीर्घकाळ चाचणी घेणे गरजेचे होते; परंतु त्यावर लक्ष दिले गेले नाही. त्याची जबाबदारी औषधी कंपनीचीच आहे. या लशीचे दुष्परिणाम हे भविष्यात गंभीर राहू शकतात, हे ठाऊक असतानाही त्यांनी लोकांच्या आयुष्याशी खेळण्याची जोखीम कशी उचलली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून त्याचे उत्तर अ‍ॅस्ट्राझेनेकाला द्यावे लागणार आहेत. भारतीय डॉक्टरांनीदेखील या लशीचे दुष्परिणाम असतील तर क्षणाचाही वेळ न दवडता तातडीने ते परिणाम जनतेसमोर आणण्याचे प्रयत्न करायला हवेत तसेच त्याचा शोध घेऊन उपाय काढायला हवेत, परिणामी मानवाचे समाजातील जीवनमान सुरक्षित राहू शकेल.

कोरोनापुढे संपूर्ण जगाने हात टेकले होते तेव्हा सर्वांना आपला जीव वाचवण्यासाठी आटापिटा करावा लागला. अ‍ॅस्ट्राझेनेकाने जागतिक भागिदारी कंपनीसह जागतिक पातळीवर ३ अब्ज लशींची निर्मिती केली. सरकारनेदेखील त्यांना ध्येय निश्चित करून दिले होते; परंतु त्यात घाई झाली आणि ही बाब मान्यही केली गेली आहे. त्याच वेळी भारतात सीरम इन्स्टिट्युटने कोव्हिशिल्डची लस युद्धपातळीवर तयार केली आणि ती भारत सरकारला सुपुर्द केली. अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्डसमवेत काम करीत कोरोना प्रतिबंधक लस तयार केली होती. त्याच वेळी भारतात लस तयार करणारी कंपनी सीरम इन्स्टिटट्युटने अ‍ॅस्ट्राझेनेकाशी करार करून कोव्हिशिल्ड तयार केली. यानंतर देशात निम्म्यांपेक्षा अधिक लोकांनी ही लस घेतली मात्र सर्वांवर सारखेच परिणाम दिसत आहेत. अर्थात भारतातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टर हे अचानक होणा-या मृत्यूला कोरोना लशीचा संबंध असल्याच्या बाजूने नाहीत; परंतु ब्रिटिश न्याालयातील प्रकरणाने तज्ज्ञांना नव्याने विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. भारतीय डॉक्टरदेखील त्यात संशोधन करीत आहेत. आता ही जबाबदारी सरकारची असून लोकांच्या मनात कोव्हिशिल्डबाबत निर्माण झालेली भीती दूर कशी करता येईल, यासाठी पावले टाकायला हवीत.

– प्रा. विजया पंडित

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR