35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयमतटक्का वाढावा !

मतटक्का वाढावा !

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आज ७ मे रोजी तिस-या टप्प्याचे मतदान होत आहे. या तिस-या टप्प्यातील प्रचाराच्या (की अपप्रचाराच्या?) तोफा रविवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. देशभरात तिस-या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. तिस-या टप्प्यात १२ राज्यातील १३५१ उमेदवार रिंगणात आहेत. तिस-या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, डिंपल यादव, शिवराजसिंह चौहान, सुप्रिया सुळे, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती उदयनराजे भोसले, नारायण राणे, प्रणिती शिंदे, सुनील तटकरे, अनंत गीते, धैर्यशील मोहिते-पाटील, ओमराजे निंबाळकर, सुधाकर शृंगारे यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. तिस-या टप्प्यात गुजरातच्या २६ मतदारसंघांत ६५८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

त्यानंतर महाराष्ट्रात ११ जागांसाठी ५१९ उमेदवार उभे आहेत. कोकण विभागातील २, पुणे विभागातील ७ तर औरंगाबाद विभागातील २ अशा एकूण ११ मतदारसंघांत मतदान होईल. या ११ मतदारसंघांत रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. या ११ मतदारसंघांत प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते मैदानात उतरले होते. यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती. तेथे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढाई आहे. खरे पाहता मुख्य लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. बारामतीचा गड शरद पवार राखणार की अजित पवार विजयी धडक देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. ११ मतदारसंघांत २ कोटी ९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आहेत. राज्यात पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता. आता तिस-या टप्प्यात त्यात सुधारणा होईल, अशी आशा आहे.

पहिल्या दोन टप्प्यांना कडक उष्णतामानाचा फटका बसला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसे असेल तर तिस-या टप्प्यालाही हा तडाखा बसणार आहे. कारण सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशात कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर तर महाराष्ट्रातील विदर्भात तो ४४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे पारा ४५ अंश सेल्सिअसवर होता. राज्यात पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. गत चार-पाच दिवसांपासून सूर्यनारायण अक्षरश: कोपला आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पारा ४० अंशाच्या वर आहे. गत काही दिवसांपासून थांबलेले अवकाळी पावसाचे संकट पुन्हा येऊ घातले आहे. मतदान टक्का घसरण्यामागचे एकमेव कारण उष्णतामानाचा फटका हेच नाही तर दुसरेही महत्त्वाचे कारण म्हणजे निवडणूक प्रचारातील अपप्रचार! यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिशाहीन झाला आहे.

राज्यातील पाणीप्रश्नाची विदारक स्थिती झाली आहे. त्यावर केवळ भाष्यच नव्हे तर तोडगा काढण्यासाठी कोणाही राज्यकर्त्याला सध्या फुरसत नाही त्यामुळे लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा तर तो नेमका कोणासाठी? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला भेडसावत आहे. हवामान बदलाचे संकट वरचेवर अधिकच गहिरे होत चालले आहे. उष्णतामानाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. देशातील डोंगरराजी, वनसंपत्तीची खुलेआम कत्तल केली जात आहे. जागतिक व्यासपीठावरून पर्यावरणाच्या शपथा घ्यायच्या आणि देशात वृक्षतोडीला मोकळे रान करून द्यायचे, असे दुटप्पी धोरण राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे. यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून राज्यकर्त्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक उरलेले नाही. पंतप्रधान मोदींच्या जिथे जिथे सभा झाल्या तिथे किती वृक्ष जिवंत आहेत ते बघावे लागेल. शहरी भागातील धुलीकणाच्या समस्येवर उपाय म्हणून रस्ते पाण्याने धुण्याचा तुघलकी प्रयोग करण्याचे प्रयोजन काय? हा प्रश्न सत्ताधा-यांना विचारावा, असे कोणालाच वाटत नाही.

ग्रामीण भागातील नद्या, तलाव बाष्पीकरण होऊन झपाट्याने आटू लागले आहेत. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्य पशू-पक्ष्यांनी आपला मोर्चा लोकवस्त्यांकडे वळविला आहे. भू-जल-वायू प्रदूषणाच्या मूळ मुद्यावर ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असाच पवित्रा राज्यकर्त्यांनी घेतला आहे. तरुणांच्या देशापुढील महागाई, बेरोजगारीचे मुद्दे दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. देशातील दारिद्र्य वाढत चालले आहे. गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी अधिकच वाढत चालली आहे. गरिबी हटावपेक्षा गरिबांना हटविण्याचे प्रयोग सुरू आहेत. देशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर येऊनसुद्धा त्या विषयी कोणाला काही बोलावेसे वाटत नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देशात राज्यघटना बदलणार की नाही या मुद्यावरून रणकंदन सुरू आहे. माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कार्यकाळातील चघळून चोथा झालेल्या मुद्यावरून नव्याने चर्चा घडवून आणली जात आहे. मुस्लिमांना आरक्षण द्यावे की नाही,

यावरून समाजमन कलुषित करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. ज्यांचे बोट धरून राजकारणात आल्याच्या गप्पा मारल्या त्यांच्यावरच आता ‘भटकता आत्मा’ अशी टीका केली जात आहे. कुणाला किती मुले आहेत यावरून अकारण वाद वाढविण्यात येत आहेत. निवडणूक प्रचाराला कधी जातीय तर कधी धार्मिक रंग देऊन वातावरण चिघळविण्याचे प्रयत्न होत आहेत. पक्ष फोडाफोडी, आमदार फोडाफोडीत राजकीय नेते मश्गुल झाले. यातून पक्षात भाऊगर्दी झाली त्यामुळे भाकरी फिरविण्याचे सोडा ती हिसकावून घेण्याचे प्रकार सुरू झाले. पक्ष, आमदार, खासदार फोडून काय मिळविले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. देशहिताच्या मुद्यावर चर्चा कमी आणि उखाळ्या-पाखाळ्याच अधिक झाल्यानेच मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असावी तरीही मतटक्का वाढावा, ही अपेक्षा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR