30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयनायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट!

नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट!

नवी दिल्ली : खलिस्तान फंडिंगप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या असून नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना आता या प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) माध्यमातून चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

केजरीवाल यांच्यावर बंदी घालण्यात आलेल्या ‘शीख फॉर जस्टीस’ या संघटनेकडून निधी घेतल्याचा आरोप आहे. राजभवनाकडूनच आज ही माहिती देण्यात आली. नायब राज्यपालांच्या या भूमिकेचा ‘आप’ने निषेध केला आहे. राज्यपालांनी केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले असून त्यात केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला खलिस्तान समर्थकांकडून १ कोटी ६० लाख डॉलरचा निधी मिळाला असल्याची तक्रार आपल्याला प्राप्त झाली असल्याचे म्हटले आहे. खलिस्तानी देविंदरपाल भुल्लर याच्या सुटकेसाठी आपला हा निधी देण्यात आल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. तक्रारकर्त्यांनी तक्रार अर्जासोबत काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे सादर केली असून त्यांची अद्याप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून तपासणी होणे बाकी आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेली लोकसभा निवडणूक लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली असतानाच आज नायब राज्यपालांकडून केजरीवालांना दुसरा मोठा धक्का देण्यात आला. केजरीवाल हे सध्या तिहार कैद तुरुंगात आहेत.

मोंगियांची तक्रार
नायब राज्यपालांकडून करण्यात आलेल्या एनआयए चौकशीच्या शिफारशीनंतर आम आदमी पक्षाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. हे प्रकरण वाढले तर केजरीवालांचा तिहार तुरुंगातील मुक्काम आणखी वाढू शकतो. नायब राज्यपालांनी अशू मोंगिया यांनी केलेली तक्रार गृहमंत्रालयाकडे पाठविली आहे. या तक्रारीच्या आधारेच त्यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या चौकशीची शिफारस केली आहे.

न्यूयॉर्कमध्ये झाली बैठक
मोंगिया जागतिक हिंदू महासंघ, भारतचे राष्ट्रीय सरचिटणीस असून त्यांनी आम आदमी पक्षाला खलिस्तानी समुहाकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली असल्याचा दावा केला आहे. ‘शीख फॉर जस्टीस’सारख्या संघटनेने लाखो डॉलरचा निधी ‘आप’ला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या रिचमंड हिल्स गुरुद्वारात २०१४ मध्ये खलिस्तान समर्थक नेत्यांची बैठक झाली होती. त्यात केजरीवाल सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाला आर्थिक मदत केल्यास देविंदरपाल भुल्लर याची सुटका करण्याचे आश्वासन केजरीवालांनी दिले होते असे तक्रारकर्त्याने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR