निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील लांबोटा पाटी ते लांबोटा गावाकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या चिखलमय झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेल्या मुरमामुळे पहिल्याच पावसात संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने पायी चालणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वार वारंवार घसरत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. गावातील शाळा, शासकीय कार्यालये तसेच बाजारपेठेत ये-जा करणा-या नागरिकांना या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना दररोज चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत असल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाची मागणी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, रस्त्याचे मूळ काम मंजूर नसताना केवळ डागडुजी करून रस्ता अधिक खराब का करण्यात आला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच लांबोटा पाटी ते गाव रस्त्याचे काम तातडीने मंजूर करून दर्जेदार रस्ता तयार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर राहूल बिराजदार, प्रशांत देवमुळे, दत्ता काकळकुंडे, काडू पाटील, सुधाकर बिराजदार, मोहन शिरसाट, सुरेश जवार, गंगाधर पाटील, नंदू गायकवाड, दशरथ रुमणे, ज्ञानेश्वर शिंगारे, लक्ष्मण सूर्यवंशी, शिवाजी गायकवाड, संदीप मुगळे, संजीव मुगळे, यासीन शेख, रमेश कुलकर्णी, प्रतीक बिराजदार, प्रशांत मुगळे, शफीक शेख, जीवन लोंढे पाटील आदी ग्रामस्थांच्या स्वाक्ष-या आहेत. दरम्यान, याबाबत शाखा अभियंता मोजन यांच्याशी संपर्क साधला असता, गतवर्षी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार उपलब्ध साधनसामग्रीतून खड्डे बुजविण्यात आले होते. त्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर नव्हता. संबंधित रस्त्याच्या कामासाठी मागणी करण्यात आली असून निधी मंजूर होताच काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
















