वलांडी : हसन मोमीन
देवणी तालुक्यातील हेळंब येथील सर्व्हे नं. १२४ मधील शेतशिवारात गुरुवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत अल्पभूधारक व दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी संजय यशवंत सावंत यांचे अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. बँक व खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन उभा केलेला दुग्ध व्यवसाय या आगीत अक्षरश: होरपळून निघाला असून ११ म्हशी भाजल्या तर सुमारे दोन हजार कडबा, तीन स्प्रिंकलर संच, कडबा कुट्टी व अन्य शेती साहित्य जळून खाक झाले आहे.
हेळंब शेतशिवारातील सर्व्हे नं. १२४ मध्ये असलेल्या संजय सावंत यांच्या गोठ्यासमोरून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन गुरुवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाले. त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे गोठ्यालगत साठवून ठेवलेल्या कडब्याने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करीत गोठा व परिसराला विळखा घातला. या आगीत गोठ्यात बांधलेल्या पाच दुभत्या म्हशींपैकी तीन म्हशी ५० ते ६० टक्के तर दोन म्हशी ३० ते ४० टक्के भाजल्या आहेत तसेच एक वर्षाखालील पाच वगारींनाही आगीची झळ बसून त्या २० ते ३० टक्के भाजल्या आहेत. जनावरांसाठी साठवून ठेवलेला सुमारे दोन हजार कडबा पूर्णत: जळून खाक झाला. याशिवाय कडबा कुट्टी मशीन, तीन स्प्रिंकलर संच आणि इतर शेती साहित्यही आगीत भस्मसात झाले.
घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. जितेंद्र वाघमारे व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी सुरेश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जनावरांवर उपचार केले. गंभीर भाजलेल्या तीन म्हशींना पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. वाघमारे यांनी दिली. दरम्यान महसूल विभागाच्या वतीने वलांडीचे मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे व तलाठी लक्ष्मण कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या आगीत झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे सावंत कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. बँक व खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन सुरू केलेला दुग्ध व्यवसाय एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने शासनाने तात्काळ मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हेळंबचे माजी सरपंच रणजीत सावंत, सरपंच आयोध्या शिरसे व उपसरपंच सोपान शिरसे यांनी केली आहे. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे संजय सावंत यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जनावरांच्या उपचारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
















