38.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरलातूरची अभिनव छाप ठरलेली, हौशी राज्य नाट्य स्पर्धा आली रंगात

लातूरची अभिनव छाप ठरलेली, हौशी राज्य नाट्य स्पर्धा आली रंगात

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयद्वारा आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरी लातूर केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. ४ डिसेेंबरपासून सूरु झाली. ही स्पर्धा आता अगदी रंगात आली आहे. राज्यातील इतर केंद्रांवरील स्पर्धेहून लातूरची ही स्पर्धा आपला वेगळा आणि अभिनव ‘लातूर पॅटर्न’चा ठसा निर्माण करणारी ठरत आहे.

या स्पर्धेतील बारापैकी अकरा नाट्यसंघ लातूरचे असून यापुर्वी कधीही न झालेला हा विक्रम ठरला आहे. जवळपास पाचशे कलावंतांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत अर्ध्याहून अधिक संख्या नवीन कलावंतांची आहे. एका अर्थाने लातूरची ही नाट्य चळवळ नव्या पिढीने आपलाा हाती घेतल्याचे आशादायी चित्र दिसत आहे. स्पर्धेतील सर्वच नाटकांचा आशय, विषय आणि शैलीतही खुप विविधता आढळून येत असून यामुळे लातूरच्या नाट्यरसिकांची गर्दी या स्पर्धेकडे वळली आहे. स्पर्धा असूनही परस्परांशी सहकार्याची आणि खेळीमेळीची भावना इथल्या सर्व नाट्यसंघात प्रकर्षाने जाणवते आहे.

नाट्य सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांनी स्पर्धेचे समन्वयक या नात्याने स्पर्धेअगोदर सर्व नाट्यसंघांच्या तालमींना भेट देऊन त्यांच्या अडीअडचणींची सोडवणुक करण्याचा केलेला प्रयत्न सर्वांच्या दृष्टीने प्रशंसनीय ठरला आहे. लोक सहभागाचा अभिनव लातूर पॅटर्न तर खुपच लक्षणिय ठरला आहे. रात्री उशीरा नाटक संपल्यावर कलावंतांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून बाळकृष्ण धायगुडे, नंदकुमार वाकडे, संग्राम जल्दे, उमाकांत हुरदुडे, गणेश पवार, जीवन वाघमारे, विपूल वाकडे या संयोजक सदस्यांनी लातूरच्या काही प्रतिष्ठीत आणि दानशुर व्यक्त्तींना याबाबतीत अवगत करुन त्यांचे योगदान मिळवले.

यातून प्रत्येक दिवशी प्रयोगानंतर या कलावंतांना स्नेहभोजन देण्याचा हा उपक्रमही लातूरची शान वाढविणारा आणि महाराष्ट्रातील एकमेव ठरला आहे. नाटकांच्या प्रारंभी होणा-या नटराज पुजनातही ज्येष्ठ रंगकमी, रोज नेमाने येणारे नाट्यरसिक, शहरातील मान्यवरांचा समावेश करुन त्यांचा सत्कार करणे, हीसुद्धा खूप उल्लेखनीय गोष्ट या निमित्ताने घडत आहे. शासकीय कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून अभिनव पद्धतीने ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या या वेगळया प्रयत्नांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक बिभीषण चवरे, अधिकारी मिलिंद बिरजे यांनी कौतूक केले असून हा लातूर पॅटर्न राज्य नाट्य स्पर्धेच्या वर्तूळात दिशादर्शक ठरतो आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR