केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
अहमदपूर : प्रतिनिधी
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्तिस्थळ येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर-टेंभुर्णी रस्त्याच्या कामाबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु या कामाशी संबंधित सर्व अडचणी दूर करून लवकरच हे काम मार्गी लागेल आणि या भागातून पुण्याहून ये-जा करणा-यांसाठी चांगल्या रस्त्याची सोय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळ येथे रस्त्याचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते. या समारंभादरम्यान गडकरी यांना लातूर-टेंभुर्णी रस्त्याची आठवण करून दिली. त्यावर बोलताना गडकरी यांनी या रस्त्याविषयी बोलताना मला लाज वाटायला लागली आहे. कारण काही लोकांनी यात अडथळे निर्माण केले होते. परंतु या रस्त्याच्या कामातील अडचणी दूर करून कामास मंजुरी देण्यात येत आहे. आता या मार्गाचे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सध्या दुष्काळी स्थिती असल्यामुळे जलसंधारणाच्या कामाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असा आग्रहही धरला.