30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्र‘लातूर पॅटर्न’ला भंगार म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना भंगारात टाकण्याची वेळ

‘लातूर पॅटर्न’ला भंगार म्हणणा-या मुख्यमंत्र्यांना भंगारात टाकण्याची वेळ

मुंबई : केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात शिक्षणासाठी ज्या ‘लातूर पॅटर्न’चे गौरवाने नाव घेतले जाते, त्या पॅटर्नला राज्याचे मुख्यमंत्री भंगार पॅटर्न म्हणतात. मला वाटतं आता यांनाच भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी महायुतीवर टीका केली. केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजपने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आणि संघर्ष निर्माण करण्याचे पाप केले.
देवेंद्र फडणवीस हे फसणवीस आहेत, असा हल्लाही पटोले यांनी त्यांच्यावर चढवला. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे दोन लाख मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील निवडणुकीत मराठा, धनगर समाजाला आरक्षण देतो, केंद्रात व राज्यामध्ये भाजपला सत्ता द्या, असे फडणवीस म्हणाले होते. तुम्ही एकहाती सत्ताही त्यांना दिली, पण मिळाले का आरक्षण? केवळ मतांसाठी मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्याचे पाप त्यांनी केले. आतातरी लक्षात ठेवा ते फडणवीस नव्हे तर फसणवीस आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला.

शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी अहमदपूर, निलंगा, चाकूर येथे सभा झाल्या. या वेळी केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात लातूर पॅटर्नला भंगार पॅटर्न म्हणून संबोधल्याबद्दल आता यांना भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशी टीका पटोले यांनी केली. अमित देशमुख यांनी त्यांच्या भाषणात विजय काळगे यांचा विजय दोन लाखांच्या मताधिक्याने होणार असल्याचे सांगितले.
पण मी यापुढे जाऊन सांगतो की, ते दोन नाही, तर पाच लाख मताधिक्याने निवडून येणार आहेत.

महाराष्ट्रातही सध्या भाजपच्या विरोधात लाट असून लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच जागा निवडून येतील, असा दावा पटोले यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थिक धोरण बदलण्याचे पाप भाजप सरकारने केले असून जीएसटी आणून अदानी, अंबानींच्या घरापर्यंत पैसे पुरवण्याचे काम केले.

महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवून नेण्याचे काम भाजपने केले आहे. कांदा उत्पादक शेतकरी संपूर्ण देशात असताना केवळ गुजरातच्या शेतक-यांसाठी कांदा निर्यातीस परवानगी दिली. त्यामुळे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत की, गुजरातचे हेच कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोदींच्या सभेला तीन हजार रुपये देऊन माणसं आणली, कोरोना लसीमुळे अनेक गंभीर आजार वाढले असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, विनायकराव पाटील, आमदार डॉ. वाजाहदजी मिर्झा यांनी आपल्या भाषणातून राज्यातील महायुती व केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR