26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रश्रीरंग बारणेंच्या अडचणीत वाढ?

श्रीरंग बारणेंच्या अडचणीत वाढ?

दिल्लीहून सहा जणांचे पथक दाखल

पिंपरी : पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दोनवेळा खासदार राहिलेले श्रीरंग बारणे यांच्या चिंतेत वारंवार वाढ होत आहे.

महायुतीचे घटकपक्ष बारणे यांचा प्रचार किती सक्रियपणे करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. या मतदारसंघातून महायुतीचे इतर अनेक नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण सलग तिस-यांदा बारणे मैदानात उतरले आहेत. मावळ मतदारसंघ हा दोन जिल्ह्यांत विभागलेला आहे. यामध्ये पुण्यासह रायगड जिल्ह्याचा समावेश होतो.

रायगडमधील उरण, पनवेल आणि कर्जतचा भाग मावळ मतदारसंघात येतो. पिंपरी-चिंचवड परिसर त्याचबरोबर रायगडमधील विधानसभा मतदारसंघातील भागात महायुतीचे कार्यकर्ते आणि नेते सक्रियपणे काम करत आहेत का नाही हे पाहण्यासाठी दिल्लीवरून सहा जणांचे विशेष पथक आले आहे. हे पथक भाजप पक्षनेतृत्वाला गोपनीय अहवाल सादर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बारणेंसाठी मनापासून काम करतील की नाही, याची भीती महायुतीला चांगलीच सतावत आहे.

मावळमध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांना, तर ठाकरे गटाकडून माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळाली आहे. मावळमध्ये मागील १५ वर्षांपासून कमळ चिन्ह नसून या वेळी कमळावर लढणारा उमेदवार देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, बापू भेगडे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. परंतु, मावळ मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडेच कायम राहिला. तसेच पुणे आणि राजगडमध्ये विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला होता.

महायुतीचे काम नाही केल्यास कारवाई
दिल्लीवरून आलेले हे पथक १० मेपर्यंत मुक्कामी असणार आहे. महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम करीत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामांची नोंद केली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामगिरीची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. प्रचारापासून अलिप्त, विरोधात काम करणा-या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माहिती घेतली जात आहे. त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे. विरोधात काम करणा-या व्यक्तीला महायुतीकडून संधी देण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR