27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरलोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी प्रशासन सज्ज

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी प्रशासन सज्ज

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर मतदारसंघात ७ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान २ हजार १२५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ५ मे रोजी सायंकाळी ६ पासून जाहीर प्रचार बंद झाला आहे. या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. मतदारांवर कोणत्याही आमिष, प्रलोभन दिले जात असल्यास किंवा कोणताही दबाव आणला जात असेल किंवा धमकावले जात असल्याचे निदर्शनास असल्यास अशा व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची प्रमुख उपस्थिती होती.

लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ७७ हजार ४२ इतके मतदार आहेत. २ हजार १२५ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून यासाठी नियुक्त मतदान पथकांमध्­ये ८ हजार ५०० अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी बीएलओ, चतुर्थश्रेणी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्­य कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी असे ८ हजार २६५ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्­याचप्रमाणे मतदान केंद्राच्­या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्­त करण्­यात आलेली आहेत. कायदा व सुव्­यवस्­थेसाठी बीएसएफ, एसआरपीएफ दलाच्या तुकड्या जिल्ह्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

लोकसभा मतदारसंघात यावर्षी प्रथमच इकोफ्रेंडली मतदान केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. तसेच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान केंद्रांवर विविध प्रकारच्या बियांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याची अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघात महिला नियंत्रित, युवा नियंत्रित आणि दिव्यांग नियंत्रित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे.
एक हजार ६२ केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर वेब कांिस्टगद्वारे नजर : लातूर लोकसभा मतदारसंघातील ५० टक्के म्हणजेच जवळपास एक हजार ६२ मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्ंिटग केले जाणार असून याद्वारे संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक यांची मतदान प्रक्रियेवर नजर राहणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र संनियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेला आहे.

मतदान पथके, मतदान यंत्र वाहतुकीवर राहणार लक्ष : लातूर मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी ६ मे रोजी मतदान पथके रवाना होणार आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकारी, भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, व्हीडीओ निगराणी पथके अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या ७९३ जीप, ३०१ बसेसची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व वाहनांच्या हालचालीचे जीपीएस प्रणालीद्वारे संनियंत्रण केले जाणार आहे. विशेषत: मतदान यंत्रे घेवून जाणारी वाहने आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या ताब्यातील मतदान यंत्रांची वाहतूक करणा-या वाहनांवर जिल्हाधिकारी कार्यालयातून निगराणी केली जाणार आहे.

सकाळी साडेपाच वाजता मॉक पोल, सातपासून प्रत्यक्ष मतदानाल सुरुवात : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे रोजी होणा-या मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. मतदाना दिवशी ४ हजार २५० बॅलेट युनिट, २ हजार १२५ कंट्रोल युनिट आणि २ हजार १२५ व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR