शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील बाकली येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून स्थानिक आमदार निधीतून या सभागृहासाठी निधी मंजूर करण्यात आला होता.
सभागृहाचे लोकार्पण गावचे सुपुत्र व माजी सैनिक अच्युत चिंचोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास गावातील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपसरपंच पंकज रक्षाळे सांगितले की, या सभागृहासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. हे सभागृह धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी सभागृहाला भविष्यात पूर्ण सौरऊर्जेवर (सोलार) आधारित करून २४ तास वीज उपलब्ध करून देण्याचा तसेच समाजातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या सभागृहाचे अभ्यासिकेत रूपांतर करण्याचा मनोदयही व्यक्त करण्यात आला.
या कामासाठी निधी उपलब्ध करून ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्याबद्दल माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचे ग्रामस्थांनी मन:पूर्वक आभार मानले. यावेळी सरपंच प्र. हाणमंत बालूरे, ग्रा. पं. सदस्य उमाकांत पाटील, माजी सरपंच दत्ता पाटील, पोलीस पाटील शरद पाटील, जेष्ठ नागरीक बाबुराव चिंचोले, शिवाजी सालिमे, राहूल पाटील, जनार्धन गजभार आदी उपस्थीत होते.
















