औसा : प्रतिनिधी
इंडो सोया डेव्हलपमेंट असोसिएशन आणि महा मराठवाडा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या सभासद शेतकरी उत्पादक कंपन्यांची संयुक्त बैठक दि. १ ऑगस्ट रोजी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण, सोयाबीन उत्पादनातील गुणवत्ता वाढ, बाजारपेठेतील नवीन संधी, शाश्वत शेती पद्धती तसेच शेतक-यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी परस्पर सहकार्य, सामूहिक नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन खर्चात बचत, दर्जेदार बियाणे व कृषी निविष्ठांची उपलब्धता, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, साठवण सुविधा आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
तसेच सोयाबीन उत्पादक शेतक-यांना बदलत्या बाजारपेठेच्या गरजेनुसार मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे नेटवर्क अधिक सक्षम करणे, विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देणे आणि कृषी क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्याबाबतही विचारमंथन झाले. संघटित प्रयत्नांच्या माध्यमातून शेतक-यांचे उत्पन्न वाढविणे, मूल्यसाखळी मजबूत करणे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी इंडो सोया डेव्हलपमेंट असोसिएशन व महा मराठवाडा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने कृषी व शेतकरी हिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचा श्रीकृष्णाची मूर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस इंडो सोया डेव्हलपमेंट असोसिएशनचे संचालक महावीर कोचेट्टा व अनंत गायकवाड यांच्यासह जयप्रकाश शिंपी, समीर देशमुख, संजय कुलकर्णी, शैलेश कुमदाळे, गोविंद जाधव, दीपक देशमुख तसेच विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















