29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरलोकशाही, संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीला मतदान करा

लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीला मतदान करा

लातूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे देशात आणिबाणीपेक्षा विदारक स्थिती निर्माण केली आहे. ‘राष्ट्रवाद’ या शब्दाच्या आडून ‘धर्मसत्ता’प्रस्थापित करुन देशातील लोकशाहीचा गळा घोटून  संविधान बदलण्याची भाषा वारंवार केली जात आहे. देशातील लोकशाही मुल्य पायदळी तुडवली जात असल्याने आम्ही अस्वस्थ झालो आहोत. आता आम्ही गप्प राहिलो तर पुढीची पिढी आम्हाला माफ करणार नाही, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो असून लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी आपल्या मतांची शक्ती उभी करावी, असे आवाहन पुरोगामी चळवळीचे अग्रणी डॉ. सोमनाथ रोडे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केले.
सध्या लोकसभेची निवडणुक सुरु आहे. देशाचे भवितव्य घडविणा-या या निवडणुकीत विद्यमान सरकारने लोकशाही व संविधानाला धोका निर्माण केला आहे. त्यामुळे लातूर शहरातील बुद्धीवादी, पुरोगामी चळवळीतील मतदारांमध्ये जागृती करण्याचे अभियान सुरु केले आहे. या अनुषंगाने येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सोमनाथ रोडे बोलत होते. यावेळी माजी न्यायाधीश आर. वाय. शेख, माधव बावगे, नरसिंग घोडके, पी. जी. भिसे, अ‍ॅड. उदय गवारे, बकत काझी, प्रा. अर्जुन जाधव, उमाकांत धावारे यांची उपस्थिती होती. राजकीय व्यासपीठावर आम्ही कधी आलो नाही, परंतू, आज देशाची परिस्थिती बिकट आहे. म्हणून रस्त्यावर आलो असून आम्ही सर्व बुद्धीजिविंनी ‘इंडीया आघाडी’ला पाठींबा दिला आहे, असे नमुद करुन डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले, गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. उलट लोकशाही आणि संविधानाला धोका कसानिर्माण होईल, असे निर्णय घेतले आहेत. देशातील भाजपा, आर. एस. एस.च्या विरोधात आम्ही मतदारांमध्ये जाऊन लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मतदान करण्याबाबत जनजागृती करीत असल्याचेही त्यांनी सांगीतले.
यावेळी बोतलाना माधव बावगे म्हणाले, देशातील विद्यमान सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल, ज्यामुळे लोकशाही संपेल. त्यामुळे आता परिवर्तनवाद्यांनी शांत बसून चालणार नाही. देशासाठी, देशातील लोकशाहीसाठी आणि संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची, सक्रीय होण्याची गरज आहे. त्याकरीता आम्ही मतदान होईपर्यंत या अभियानाच्या माध्यातून मतदारांमध्ये जाऊन काँग्रेस महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करीत आहोत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीतही हेच अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी बोलताना नरसिंग घोडके म्हणाले, भाजपाचे जातीयवादी थैमान रोखून लोकशाही व संविधान सुरक्षीत राहिल यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. डॉ. शिवाजी काळगे यांना मतदान करण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR