लातूर : प्रतिनिधी
अंतर्मनातील प्रकाशात स्वत:कडे पाहता येणे आवश्यक असून, शरीर हे चैतन्य आत्म्याचे वस्त्र आहे. शांतता हाच आत्म्याचा मूळ संस्कार, स्वभाव आणि धर्म आहे. ‘मी’पणातून बाहेर पडून ‘हे विश्व माझे आहे’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना प्रत्येकात रुजायला हवी. प्रत्येक आत्मा दिव्य असून, प्रकृती आणि आत्मा परस्परांच्या सोबतीने चालतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्रीचा अंधार तसेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या प्रकृतीच्या विविध अवस्था आहेत. देहाभिमान वाढत असला तरी प्रकृती मूळत: सत्वप्रधान आहे, याची आत्मप्रचिती व्हायला हवी. प्रत्येकाने देण्याची वृत्ती जोपासत सद्गुणी वागावे आणि जीवनातील आत्मारूपी दिवा विझू देऊ नये, असे विचार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सुप्रसिद्ध वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी व्यक्त केले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने संस्थेच्या भव्य प्रांगणात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सुप्रसिद्ध वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचा ‘रिचार्ज युवर लाईफ’ हा प्रेरणादायी प्रवचन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राजयोगी स्वर-उत्सव व कथक नृत्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमास आमदार अमित देशमुख, खासदार शिवाजीराव काळगे, आमदार प्रवीण स्वामी, महापौर जयश्री सोनकांबळे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष ललितकुमार्र शहा, सचिव रमेश बियाणी, विशाल लाहोटी, अॅड. श्रीकांत उटगे, सहाय्यक सचिव श्री. अजिंक्य सोनवणे, संजय बोरा, ब्रह्माकुमारी नंदा दीदी, ब्रह्माकुमारी पुण्य दीदी आदी उपस्थित होते.
अनावश्यक ‘ओव्हर थिंकिंग’ टाळण्याचे आवाहन करताना त्या म्हणाल्या की, सतत फोन स्क्रोल केल्याने मनाची गती वाढते आणि आत्मारूपी बॅटरी कमी होते; एका मिनिटाच्या व्हिडिओमुळेही मनाची चंचलता बदलते. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या प्रभावाखाली असून, मुले नजरेला नजर मिळवण्याऐवजी खाली मान घालून स्क्रीनशी बोलत आहेत व लिहिण्याऐवजी व्हॉइस टाईपिंग करत आहेत. अशा वेळी पालकांनी सकारात्मक भूमिका घेत मुलांना व स्वत:ला मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्यास शिकवावे. घरातील कर्त्या व्यक्तीने प्रतिकूल परिस्थितीत ढाल बनावे. मनाला कोणतेही वय नसते; नैराश्य व वैफल्यावर चांगली झोप हा उपाय आहे. दृढ संकल्पातून सिद्धी होते आणि निसर्गही संकल्पाला साथ देतो, असे सांगत शिवानी दीदींनी स्वत:चा आनंद, निरोगी शरीर, चांगले नातेसंबंध, कर्म व भाग्य ओळखणे आणि परमेश्वराच्या आशीर्वादशक्तीशी एकरूप होण्याचा संकल्प करण्यास सांगितले. ज्याप्रमाणे आपण मोबाईल किंवा इतर उपकरणे चार्ज करतो, तसेच दररोज ध्यान व आत्मचिंतनातून मनाची पॉवरबँक रिचार्ज करणे काळाची गरज आहे.
















