33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयविकसित भारत घडविण्याचा निर्धार, १४० कोटी देशवासीयांना मोदींचे पत्र

विकसित भारत घडविण्याचा निर्धार, १४० कोटी देशवासीयांना मोदींचे पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मोदी यांनी गेल्या १० वर्षांबाबत भाष्य केले आहे. शिवाय गेल्या काही वर्षांत कोणत्या योजना राबवल्या आणि कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रउभारणीचा आमचा प्रयत्न सुरूच असून, विकसित भारत घडवण्याच्या निर्धाराने देश पुढे जात असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रात लिहितात, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, तुम्ही मला साथ दिली, त्याला आता एक दशक पूर्ण होत आहे. माझ्या १४० कोटी लोकांच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचा विश्वास, सहकार्य आणि पाठिंब्याचे हे मजबूत नाते माझ्यासाठी किती खास आहे हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.

माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात आलेला सकारात्मक बदल ही आमच्या सरकारची गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठी संपत्ती आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रत्येक धोरण आणि प्रत्येक निर्णयाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे अर्थपूर्ण परिणाम आपल्यासमोर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतून कायमस्वरूपी घरे, सर्वांसाठी वीज, पाणी आणि गॅसची योग्य व्यवस्था, आयुष्मान भारत योजनेतून उपचार व्यवस्था, शेतकरी बंधू-भगिनींना आर्थिक मदत, मातृ वंदना योजनेतून माता-भगिनींना मदत असे अनेक प्रयत्न माझ्याकडे आहेत.

विकसित भारत घडवण्याच्या निर्धाराने देश पुढे जात आहे. हे साध्य करण्यासाठी मला तुमच्या कल्पना, सूचना, पाठबळ आणि सहकार्य हवे आहे. मला विश्वास आहे की आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळत राहील. न थकता आणि न थांबता राष्ट्र उभारणीसाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, ही मोदींची हमी आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा, असे मोदी म्हणाले.

पायाभूत सुविधांची निर्मिती केली
भारत विकास आणि वारसा घेऊन पुढे जात आहे. गेल्या दशकात पायाभूत सुविधांच्या अभूतपूर्व बांधकामाचा साक्षीदार मी आहे. आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वारशाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार होण्याचा मानही आपल्याला मिळाला. आज प्रत्येक देशवासीयाला अभिमान आहे की, देश आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा जपत पुढे जात आहे.

३७० कलम, तिहेरी
तलाकबाबत निर्णय
तुमच्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी, कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवरील नवीन कायदा, संसदेतील महिलांसाठी नारी शक्ती बंदन कायदा, नवीन संसद भवनाचे बांधकाम, दहशतवादावर कठोर हल्ला आणि अशा अनेक ऐतिहासिक आणि मोठ्या गोष्टी घडल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR