37 C
Latur
Saturday, March 28, 2026
Homeमहाराष्ट्रविजेचे दर कमी होणार

विजेचे दर कमी होणार

 

पूर्वीच्या निर्णयावर वीज नियामक आयोगाचे शिक्कामोर्तब

स्मार्ट मीटर घेणा-या
ग्राहकांना जास्त सवलत

मुंबई : प्रतिनिधी
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज दर निश्चितीबाबत फेरसुनावणी घेऊन राज्य वीज नियामक आयोगाने आपल्या पूर्वीच्याच निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. पुढील ५ वर्षात सर्वच प्रवर्गातील ग्राहकांना पुरवण्यात येणा-या विजेचे दर टप्प्याटप्प्याने कमी होणार असून, याची सुरुवात १ एप्रिलपासून होणार आहे. स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा विजेच्या दरात सवलत मिळणार आहे.

राज्य वीज दर नियामक आयोगाने २०२५ ते २०३० या ५ वर्षांसाठी विजेचे दर मागच्या वर्षी मार्च महिन्यात निश्चित करून दिले होते. मात्र, या निर्णयाला आव्हान देऊन पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. त्यावरही आयोगाने जून महिन्यात आपला निर्णय दिला. या निर्णयाला पुढे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. महावितरणची बाजू ऐकून घेण्यात आली नाही म्हणून उच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर बोट ठेवले व जूनचा आदेश रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा जनसुनावणी घेतली. नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन करून व सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून आज आपला निर्णय जाहीर केला. वीज दर कपातीबाबतच्या आधीच्या निर्णयावर आयोगाने शिक्कामोर्तब केले.

१०० ते ३०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठीचा दर १३ रुपये १७ पैशावरून कमी होऊन १२ रुपये ९४ पैसे होईल. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांसाठीचा दर १० रुपये ७७ पैसे प्रती युनिटवरून कमी होऊन १० रुपये ७१ पैसे इतका होईल. याशिवाय स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ५ या कालावधीतील वापरासाठी प्रती युनिट ८५ पैसे सवलत मिळेल. उद्योगांना व व्यावसायिक वीज ग्राहकांना सकाळी ८ ते दुपारी ५ या कालावधीतील वीज वापरासाठीची टीओडी सवलत चालूच राहणार आहे. या ग्राहकांना वीज दरात एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यात २५ टक्के सवलत मिळणार आहे.

२०३० पर्यंत विजेचे दर
टप्प्याटप्प्याने कमी होणार
आयोगाच्या निर्णयानुसार घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे विजचे दर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीज दर वाढणार नाहीत. १ एप्रिल २०२६ पासून नवीन दराची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठीचा सध्याचा ७ रुपये ३१ पैसे हा दर कमी होऊन ७ रुपये १० पैसे होईल. पुढील ५ वर्षात वीज दर २६ टक्क्यांनी कमी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR