निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील माकणी (थोर) येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने पशु वंध्यत्व निवारण शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरास परिसरातील पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत ३७७ वैरण बियाण्यांच्या पिशव्यांचे वितरण करण्यात आले. तसेच गावातील पशुधनाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पशु सुधार समिती’ची स्थापना करण्यात आली.
ग्रामीण भागातील पशुधनाची उत्पादकता वाढविणे, जनावरांमधील वंध्यत्वाचे प्रमाण कमी करणे आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे या उद्देशाने आयोजित शिबिरात पशुवैद्यकीय अधिका-यांनी जनावरांची तपासणी करून आवश्यक उपचार केले. याशिवाय जनावरांचे आरोग्य, संतुलित आहार, लसीकरण, कृत्रिम रेतन, प्रजनन व्यवस्थापन तसेच आधुनिक पशुपालनाबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत पशुपालकांना दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि दूग्ध उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने मका बियाण्याच्या ४ किलो वजनाच्या २४२ पिशव्या आणि ज्वारी बियाण्याच्या २ किलो वजनाच्या १३५ पिशव्या, अशा एकूण ३७७ वैरण बियाण्यांच्या पिशव्या लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या.
यावेळी गावातील पशुधनाच्या आरोग्य, संवर्धन व विकासासाठी स्थानिक स्तरावर प्रभावी नियोजन करण्याच्या उद्देशाने ‘पशु सुधार समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून शासनाच्या पशुसंवर्धन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम करणे तसेच पशुपालकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य तानाजी बिरादार, पंचायत समिती सदस्या विजयमाला शिवाजी जाधव, उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी, श्रीनिवास सूर्यवंशी, डॉ. कविता कलवले, बालाजी जाधव, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील पशुपालक उपस्थित होते. यावेळी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. आधुनिक पशुपालनाचा अवलंब केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून शेतकरी व पशुपालकांच्या उत्पन्नात निश्चीतच वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
















