लातूर : प्रतिनिधी
ध्वनी, जल आणि वायू प्रदूषणासोबतच समाजात वैचारिक प्रदूषणाचा प्रकार वाढीस लागला असून, हेच वैचारिक प्रदूषण सर्व प्रकारच्या नैसर्गिक प्रदूषणांचे मुख्य मूळ आहे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. दयानंद विधी महाविद्यालय लातूर आणि लातूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “न्यायसंवाद: कायदा, पर्यावरण आणि नागरिक” या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी उपस्थित होते. तर याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र शासकीय न्यायाधिकरण (मुंबई) चे अध्यक्ष न्यायमूर्ती मंगेश पाटील, पर्यावरण तज्ज्ज्ञ अतुल देऊळगावकर, दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ललितकुमार शहा, सचिव रमेश बियाणी, अॅड. आशिष बाजपाइ, अॅड. श्रीकांत उटगे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अॅड. जयंत जायभावे, अॅड. व्ही. डी. साळुंके, लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. शिवकुमार जाधव, सचिव अॅड. गुरुप्रसाद येरटे, प्राचार्या डॉ. पूनम नाथानी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रदूषण विरहित वातावरणात राहण्याचा घटनात्मक अधिकार सर्वांना असताना देखील आपण प्रदूषणा सह जगत आहोत; कारण कर्तव्याची नसलेली जाणीव, निसर्गाप्रती बोथट भावना, कायदा पालनाविषयीची उदासीनता, सामाजिक व राजकीय निष्क्रियता ही सर्व वैचारिक प्रदूषणाचीच लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:पासून सुरुवात केली तर पर्यावरण संवर्धनास वेळ लागणार नाही, असे सांगून न्यायमूर्ती ओक म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टिकोनच पर्यावरणाचा -हास कमी करण्यास मदत करू शकतो, कारण धर्म व विज्ञानाची गल्लत न करता साजरे केले जाणारे सण व उत्सव हे पर्यावरणाची हानी टाळतात. धार्मिक उत्सव व मिरवणुकांमध्ये डीजे, फटाके आणि बेकायदेशीर बॅनरचा वारेमाप वापर टाळून प्रत्येकाने वैयक्तिक निर्बंध ठेवणे गरजेचे आहे. पर्यावरण संस्कारांचे काम शालेय जीवनापासून झाले पाहिजे. ‘वृक्ष हे पर्यावरणाचे सैनिक आहेत’ ही भावना बालमनात रुजली की पर्यावरणाचा -हास थांबेल, म्हणूनच लातूरकरांनी पर्यावरणाचा विशेष ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करावा, असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात लाहोटी म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, या संवाद कार्यक्रमामुळे विविध पर्यावरण कायदे, अधिकार व कर्तव्यांबद्दल माहिती मिळाल्याने समाजात निश्चितच सकारात्मक बदल घडेल. दरम्यान, पिढीजात श्रीमंती असूनही दातृत्व आणि कर्तृत्व जपणारे समाजशिल्पी व शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करणारे लक्ष्मीरमण लाहोटी यांनी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल, उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती पाटील यांनी ‘रुक्ष आणि वृक्ष’ यातील फरक समजावून सांगताना समाजातील रुक्षपणा घालवण्यासाठी वृक्षलागवडीची गरज अधोरेखित केली. सामाजिक व राजकीय पर्यावरण नैसर्गिक पर्यावरणावर थेट परिणाम करते, त्यामुळे दोन्हीत समतोल साधला पाहिजे.
व्याख्यानानंतर ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी न्यायमूर्ती अभय ओक यांची मुलाखत घेतली. यामध्ये ध्वनी, वायू व जल प्रदूषण, उत्तराखंड भूस्खलन आणि बेकायदेशीर होर्डिंग्ज यांसारख्या मुद्द्यांवर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी न्यायमूर्ती ओक यांनी पर्यावरण कायदे अधिक कडक करण्याची व त्यांच्या कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. आशिष बाजपाइ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आकांक्षा भांजी आणि प्रा. अक्षय पवार यांनी केले. तर आभार अॅड. गुरुप्रसाद येरटे यांनी मानले.
















