लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’ या अभिजात शास्त्रीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता दयानंद सभागृह, लातूर येथे हा संगीत दरबार रंगणार आहे.
यंदाच्या स्वरविलास संगीत दरबारात पुणे येथील विख्यात पखावज वादक कृष्णा साळुंखे यांचे दमदार पखावज वादन, तसेच लातूरच्या प्रसिद्ध गायिका डॉ. वृषाली देशमुख यांचे शास्त्रीय गायन रसिकांना अनुभवता येणार आहे. अभिजात भारतीय संगीताची समृद्ध परंपरा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला आहे. लातूरची सांस्कृतिक चळवळ सजीव ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने या संगीत दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. मागील १३८ महिन्यांपासून प्रतिष्ठानकडून शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या संगीत उपक्रमामागे राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांची संकल्पना व प्रेरणा आहे.
‘स्वरविलास संगीत दरबार’च्या माध्यमातून यापूर्वी मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर तसेच किराणा घराण्याचे जगविख्यात गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या बहारदार गायनाचा अनुभव लातूरच्या रसिकांना मिळाला आहे. या वर्षीही दर्जेदार शास्त्रीय संगीताची मैफल ऐकण्याची संधी लातूरकरांना मिळणार असून, संगीतप्रेमींमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रवीराज पोरे, नियोजनप्रमुख विशाल जाधव, मार्गदर्शक अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, किरण भावठाणकर, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. शशिकांत देशमुख, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, महेश काकनाळे, केशव जोशी, व्यंकटेश पांचाळ, खंडागळे सर, शिरीष डाबरे, हरीश कुलकर्णी, शंभुदेव केंद्रे, हरीराम कुलकर्णी, दिनकर पाटील, काकासाहेब सोनटक्के, दत्ता पाटील, सुनील टाक, विवेक डोंगरे, सतीश मिरखलकर, डॉ. भडाडे, हेमंत रामढवे, डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व रसिकांनी दयानंद सभागृहात उपस्थित राहून या अभिजात संगीत मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
…………………२४……………..
















