शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
ऑगस्ट महिना न्म्यियावर आला असतानाही शिरूर अनंतपाळ तालुक्यात अपेक्षित दमदार पाऊस झालेला नसल्याने प्रकल्प, नदी-नाले अद्याप तहानलेलेच आहेत. पावसाने पुन्हा एकदा लांबणीवर दडी मारल्याने शेतक-यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून खरीप पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतक-यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. सुरुवातीस झालेल्या पावसामुळे पिकांना उभारी मिळाली मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने अनेक भागातील पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची वाढ पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. ऑगस्ट महिन्याचा मध्यजवळ येऊनही नदी-नाले, ओढे तसेच लहान-मोठे प्रकल्प अपेक्षेप्रमाणे भरलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात समाधानकारक पाऊस झाला नाही तर खरीप पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भीती शेतक-यांकडून व्यक्त होत आहे.
शेतक-यांची चिंता वाढली
सध्या अनेक शेतकरी आंतरमशागतीची कामे उरकून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पिकांची वाढीची अवस्था महत्त्वाची असताना पावसाने दडी मारल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी एकदा तरी दमदार पाऊस होऊ दे’ अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
















