मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वत:ला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये.
राज्यात सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे अनेक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेक महिलांनी अशोक खरातने आपण बेशुद्धावस्थेत असताना आपले लैंगिक शोषण केल्याचा दावा केला आहे. पण शर्मिला ठाकरे यांनी हाच धागा पकडत कोणत्या व्हीडीओमध्ये महिला बेशुद्ध दिसतात? असा तिखट सवाल उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी महिलांना अशा भोंदूबाबांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचेही आवाहन केले.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, महिलांनी सर्वप्रथम भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. आमचे १३ आमदार आले होते, तेव्हा आमच्याकडे भोंदूबाबांसाठी अनेकजण आले होते. हे भोंदूबाबा स्वत:ला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. पण आम्ही कुणाच्याही पाया पडत नाही. या लोकांनी आमच्यासोबत फोटो काढून लोकांना आम्ही त्यांचे भक्त आहोत असे सांगितले तर आम्ही तिथे येऊन त्यांच्या कानशिलात हाणणार. त्यामुळे आमच्याकडे कुणी येतच नाही.

