नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शरद पवार गट आता अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, यासाठी थेट राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांची शरद पवार गटाने भेट घेतली आणि पटेल यांच्यावर तात्काळ अपात्रेची कारवाई करावी, अशी मागणी केली.
प्रफुल्ल पटेल यांनी ४ महिन्यांपूर्वी १० व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून देखील ती न करण्यात आल्याने शरद पवार गटाने ही भेट घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. शरद पवार गटाच्या या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजित पवार गटालाच अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केलेली आहे. यासंदर्भात वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्राच्या माध्यमातून याआधी आठवणदेखील करून देण्यात आली होती. पण यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्षपणे राज्यसभेच्या सभापतींची भेट घेतली.
अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये संघर्ष सुरू असून पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. पक्ष आणि चिन्ह आपलाच असल्याचा दावा करण्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही गटाकडून आक्रमकपणे केंद्रीय निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली जात आहे. त्यामुळे हा कायदेशीर वाद सुरू असतानाच शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या नेत्यांची कोंडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.