लातूर : प्रतिनिधी
दुष्काळग्रस्त शेतक-यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाकडून नूकसानग्रस्त शेतक-यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची दिवाळी अग्रीम मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानूसार गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ८१ हजार ९६१ शेतक-यांच्या बँकखात्यात एकुण १९० कोटी ९८ लाख रुपयांची थेट मदत जमा करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे खरीप व रबी हंगामही शेतक-यांच्या हातून गेला आहे. या नूकसानीचे पंचनामे करुन शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी शेतक-यांची मागणी होती. पंचनाम्याची प्रक्रिया सूरु असल्याने शासनाने दिवाळीपूर्व मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानूसार २ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात अग्रीम वाटपाला सुरुवात करण्यात आली होती. गुरुवारपर्यंत ३ लाख ८१ हजार ९६१ शेतक-यांच्या बँक खात्यावर १९०.९८ कोटींची दिवाळी अग्रीम जमा झाली आहे. लातूर जिल्ह्यातील ९५२ गावांची खरीप हंगाम २०२६-२७ ची सरासरी हंगामी पैसेवारी अवघी ४१ पैसे तर ऑक्टोबरअखेर ३६ पैसे सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्वच १० तालुक्यांत सुधारीत पैसेवारी ४० पैशांपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. जिल्ह्यात दुष्काळी ट्रीगर लागू करुन विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती, शेतसारा माफी, कृषिपंपांच्या वीजबिलात तातडीच्या उपाययोजना आणि रोजगार हमी योजनेची कमे सुर केली जात आहेत.
















