लातूर : प्रतिनिधी
सर्वसामान्य शेतक-याला परवडणारी, अधिक उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर देवणी गाय विकसित करण्यासाठी उत्कृष्ट वंशावळीच्या नियोजनबद्ध पैदाशीवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. वळूची निवड केवळ बा स्वरूपावर न करता त्याच्या आईची दूध देण्याची क्षमता, सातत्यपूर्ण उत्पादन व आनुवंशिक गुणधर्म लक्षात घेऊन करावी. शेतीकामासाठी बैलांची गरज कमी होत असल्याने सेक्सड सिमेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च उत्पादनक्षम मादी वासरांची पैदास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले.
देवणी गोवंश जतन व पैदासकार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व तांत्रिक चर्चासत्र नुकतेच पशु सर्वचिकित्सालय, लातूर येथे उत्साहात पार पडले. सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर बोरगावकर होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.डॉ. बाबासाहेब ठोंबरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, उपाध्यक्ष बच्चेसाहेब देशमुख, सचिव डॉ. महादेव जगताप, कोषाध्यक्ष डॉ. श्रीधर शिंदे उपस्थित होते.
यावेळी डॉ. ठोंबरे यांनी देवणी गोवंशाचा इतिहास, उत्पत्ती आणि पैदास व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले. गुजरातमधील गीर व स्थानिक डोंगरी गोवंशाच्या संकरातून देवणी गोवंश निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी पशुपालकांनी केवळ रंगावर न जाता दूध उत्पादन, शरीर क्षमता आणि वितांची संख्या यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. गाभण काळातील योग्य व्यवस्थापनामुळे अधिक वजनाचे व सुदृढ वासरू मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉ. पडिले यांनी देवणी गोपालकांनी केवळ पशुप्रदर्शनापुरते मर्यादित न राहता उत्कृष्ट पैदासकार बनण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. बोरगावकर यांनी वळूंना अतिरिक्त खाद्य देऊन स्थूल बनविण्याऐवजी नियमित व्यायाम देण्याचा सल्ला दिला. या बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. महादेव जगताप यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले. कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्रांचे डॉ शरद साळुंके सहे देवणी गो पैदासकार व पशुवैद्यक उपस्थित होते.
















