कीडग्रस्त कोचिंग संस्कृती!

देशभरात सर्वसामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत असताना, भोंदूबाबा अशोक खरातच्या विकृत लीलांनी त्रस्त असताना, हे सारे कमी होते म्हणून की काय ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीने सहनशक्तीची जणू काही परीक्षाच घेतली गेली. या प्रकरणातून जी काही माहिती पुढे येत आहे ती केवळ चक्रावून टाकणारी नसून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेची मान शरमेने खाली जावी अशीच आहे. या प्रकरणात व्यवस्थेतील काही जबाबदार प्राध्यापक मंडळींचा हात असल्याचे उघड झाले आहे. कुंपणच शेत खात असेल तर काय करणार? या प्रकरणात कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवलेल्या खासगी क्लासेस आणि अकॅडमींचा लक्षणीय सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

‘आम्ही डॉक्टर व इंजिनीअरची फॅक्टरी चालवतो’ अशी फुशारकी मारणारी जाहिरात करणा-या लातूरच्या ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यासह निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केली आहे. या जाहिरातीचा सरळ अर्थ असा की, ‘नीट’ परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण होण्यासाठी पूर्ण अभ्यास करण्याची गरजच नाही, त्यासाठी आमची ‘खास’ पुस्तिका पुरेशी आहे, ही जाहिरात पाहिल्यानंतर ‘डॉक्टर किंवा इंजिनीअर ही काय फॅक्टरीत तयार होणारी वस्तू आहे काय?’ अशी विचारणा यंत्रणेने व समाजाने करावयास हवी होती. पण दुर्दैवाने सारेच जण टक्केवारीच्या नादात वाहवत गेल्याने ही मूलभूत विचारणा कुणालाच महत्त्वाची वाटली नाही.

मुळात, शालेय शिक्षण उपलब्ध असताना एवढ्या अकॅडमींची खरोखरच गरज आहे का? त्या आकारत असलेले भरमसाठ शुल्क कितपत योग्य आहे? याचा जाब कोणीच विचारला नाही. या क्लासेसमध्ये अतिशय सुमार बुद्धीचे पण धनाढ्य कुटुंबातील विद्यार्थी अधिक असतात असे दिसून आले आहे. या क्लासेसचे ‘गेस पेपर’ परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत कसे काय जुळतात हे रहस्यच होते. परंतु या रहस्यामागे आर्थिक रहस्य दडलेले आहे हे आता लक्षात येत आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला बदनाम करणारी ही टोळी थेट परीक्षा हॉलपर्यंत पोहोचते यासारखी दुर्दैवी गोष्ट ती काय? या प्रकरणामुळे सुमारे २२ लाख निष्पाप विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना झालेला मानसिक मन:स्ताप सरकार कसा भरून काढणार आहे? आता २१ जूनला फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेगळाच प्रश्न भेडसावतो आहे. आता फेरपरीक्षेचा पेपर अधिक कठीण काढला जाईल, तेव्हा वर्षभर मेहनत करणा-या विद्यार्थ्यांचे काय होणार? ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीचे धागेदोरे जसजसे पुढे सरकत आहेत, तसतसे महाराष्ट्रातील नामांकित कोचिंग क्लासेस आणि त्यांच्या संचालकांचे काळे कारनामे समोर येत आहेत.

सीबीआयचा तपास जसा पुढे जाईल, तसे या रॅकेटचे आणखी भयावह वास्तव उघड होईल. या प्रकरणाने केवळ परीक्षांमधील गैरव्यवहारच समोर आणलेला नाही, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेभोवती उभ्या राहिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘कोचिंग संस्कृतीवर’, पालकांच्या अवास्तव महत्त्वाकांक्षांवर आणि विद्यार्थ्यांवरील अस मानसिक ताणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आज दुर्दैवाने, शिक्षणाचा मूळ उद्देश ज्ञानार्जन, विचारशक्तीची वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास हा राहिलेलाच नाही, तर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्याही मार्गाने यश मिळवणे हाच एकमेव निकष बनला आहे. नीट, जेईई आणि यूपीएससी यासारख्या परीक्षांनी शिक्षणाला इतके व्यापारी स्वरूप दिले आहे की, देशातील नामांकित शाळा आणि महाविद्यालये आता केवळ नावालाच उरली आहेत. ‘खरे शिक्षण’ आता कॉर्पोरेट कोचिंग संस्थांमध्ये लाखो रुपयांना विकले जात आहे. परिणामी, शिक्षण हे समान संधीचे माध्यम न राहता आर्थिक विषमता वाढवणारे साधन बनले आहे.

महागड्या कोचिंग क्लासेसची फी परवडणारी श्रीमंत मुले या स्पर्धेत पुढे जातात, तर अत्यंत हुशार असूनही गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची शर्यत आर्थिक क्षमतेअभावी सुरुवातीलाच संपते. कोटा किंवा लातूर सारख्या शहरांमध्ये दोन-दोन वर्षे मुलांना केवळ परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी यंत्रासारखे राबवून घेतले जाते, घोकंपट्टी करायला लावली जाते. डमी स्कूल, खोटा हजेरी अहवाल, मानसिक ताण ही आता सामान्य बाब झाली आहे. या समस्येचे समाधान केवळ कोचिंग क्लासेसवर कायदेशीर बंदी घालण्यात नाही, तर सर्वप्रथम सरकारी व खासगी शालेय शिक्षणाची गुणवत्ता इतकी मजबूत करावी लागेल की, विद्यार्थ्यांना कोणत्याही बाहेरील कोचिंगची गरजच भासणार नाही. समाजानेही आपली मानसिकता बदलून तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित क्षेत्रांना समान सन्मान देणे आवश्यक आहे अन्यथा शिक्षण हा फक्त श्रीमंतांचा विशेषाधिकार राहील. ‘नीट’ परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीतून जो काही धक्कादायक तपशील बाहेर येत आहे, त्यावरून हा केवळ एक साधा तांत्रिक घोटाळा नसून देशातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारा एक सुनियोजित ‘महाघोटाळा’ आहे.

या पेपरफुटीची पाळेमुळे अनेक राज्यांत पसरली आहेत. लातूरच्या आरसीसी क्लासेसचे सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुुरूला देवाचे स्थान दिले जाते, पण आता मोटेगावकरसारख्या व्यावसायिक प्राध्यापकांचे देशव्यापी कारनामे उघड झाल्याने गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला गेला आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर गुणवंत पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, असे प्राध्यापकच जर भ्रष्टाचारात बरबटलेले असतील तर, पालकांनी शिक्षण व्यवस्थेवर आणि परीक्षा पद्धतीवर विश्वास कसा ठेवायचा? शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा मानला जातो, पण मोटेगावकर व त्यांना छुप्या पद्धतीने साथ देणारे शिक्षण खात्यातील भ्रष्ट अधिकारी यांच्या पैशाच्या हव्यासापोटी हा ज्ञानाचा डोळा पूर्णपणे बंद झाला आहे.

आजवर विद्यार्थ्यांनी जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नसे, पण आता केवळ पैशाच्या बळावर यशाचे उद्यान विकत घेता येते, हे या शिक्षणमाफियांनी सिद्ध केले आहे. या माफियांच्या नादी लागल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याची राखरांगोळी झाली आहे. खासगी शिकवण्यांच्या मागे पालकांनी आता तरी धावू नये. शिक्षण हे सत्याचे उगमस्थान आहे, ते जर अशा असत्याच्या, भ्रष्टाचाराच्या हाती गेले तर देशाच्या भावी पिढीचा पूर्ण -हास होईल. या प्रकरणामुळे ‘लातूर पॅटर्न’ची बदनामी झाली का? या प्रश्नाचे उत्तर ‘अजिबात नाही’ असेच आहे. कारण ‘लातूर पॅटर्न’ निर्माण होण्यात या भ्रष्ट लोकांचे काहीच योगदान नाही. निष्ठावंत, प्रामाणिक प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी हा ‘पॅटर्न’ घडवला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news