लातूर : एजाज शेख
‘देवाची नवरी’ म्हणून गौरवलेली स्त्री प्रत्यक्षात पुरुषसत्ताक व्यवस्थेची आणि रूढी-परंपरांची बळी कशी ठरते, तिची शारीरिक आणि मानसिक घुसमट कशी होते, हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. नाटकाच्या शेवटी केवळ असहाय्य दु:ख न दाखवता, शोषण करणा-या रूढी आणि अंधश्रद्धेविरुद्ध बंड पुकारण्याचा संदेश दिला जातो. धर्म आणि परंपरेच्या नावाखाली स्त्रीयांचे होणारे शोषण, देवदासी प्रथेतील अमानुषता आणि त्यामागील सामाजिक वास्तव यावर लेखक प्रेमानंद गज्वी यांनी या नाटकातून परखड भाष्य केले आहे. श्रद्धेच्या आड दडलेल्या शोषणकारी व्यवस्थेला प्रश्न विचारणारे हे नाटक सामाजिक जाणीव जागृत करणारे आहे.
६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची लातूर केंद्रावरील प्राथमिक फेरी शहरातील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती भवनात सुुरु आहे. बुधवारी सायंकाळी सम्यक बहुउद्देशिय सेवाभावी ज्ञानप्रसारक मंडळ, लातूर प्रस्तूत प्रेमानंद गजवी लिखित आणि पांडूरंग नामदेव वाघमारे दिग्दिर्शित ‘देवनवरी’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले.
कर्नाटकच्या काही भागात देव नवरीची अमानुष प्रथा आहे. प्रेमानंद गज्वी यांची थेट, धारदार आणि वास्तववादी भाषा या नाटकाला अधिक परिणामकारक बनवते. यात वादच नाही. परंतु, एक दिग्दर्शक म्हणून पांडूरंग वाघमारे यांनी जे कौशल्य हे नाटक उभं करण्यामध्ये वापरले ते वाखणण्याजोगे होते. धार्मिक प्रथा, परंपरांवर बेतलेले हे नाटक असल्यामुळे प्रत्येक प्रसंग अगदी सावधगिरीने आणि बारकाईने टिपण्याचा प्रयत्न होता. नाटकातील मध्यवर्ती भुमिका साकारणा-या अरुणा वाघमारे यांनी द्रोपदीची व्यक्तीरेखा खुबीने वठवली.
अन्याय, अत्याचार सहन करुन नाटकाच्या अखेरच्या प्रसंगामधील तीचा बंड नाट्यरसिकांना भावला. पांडूरंग वाघमारे यांनी नाटकातील पुजारी अतिश्य ताकदीने उभा केला. तात्या पांचाळ, सिद्धार्थ सूर्यवंशी, विक्रांत सातपूते, अश्विनी सूर्यवंशी, शंकर गायकवाड, मुक्ताराम खलसे, दिपाली कांबळे, तुकाराम सगर, अरविंद वाघमारे, शिवशंकर स्वामी यांनी आपापल्या व्यक्तिरेखा उत्तमप्रकारे साकारल्या.
अनिल लांडगे यांचे नेपथ्य अप्रतिम होते. महेश कोंडेकर यांची प्रकाश योजना नाटकाला एका उंचीवर नेणारी ठरली. सुगत सोनकांबळे यांच्या पार्श्वसंगीताने नाटकाच्या आशयात आणखी भर टाकली. डॉ. जनार्दन माने यांची वेशभूषा प्रथा, परंपरांशी सुसंगत आणि अधिक उजाळा देणारी होती.
















