24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रश्रेयवादावरून कलगीतुरा

श्रेयवादावरून कलगीतुरा

नागपुरातील कार्यक्रमात संजय शिरसाटांचा फडणवीसांना टोला

नागपूर : महायुतीतील पक्षांमध्ये श्रेयवादावरून सततच खसखस सुरू असते. वेळ मिळताच एकमेकांवर टोलवाटोलवी केली जाते. असाच एक प्रसंग शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमात पाहायला मिळाला. यावेळी भाषण करताना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात श्रेयवादावरून कलगीतुरा पहायला मिळाला.

दरम्यान, शनिवारी नागपुरात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात श्रेयवादाचा प्रत्यय आला. आपल्यानंतर दुसरे काही निर्माण होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का? असा जाहीर टोला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला. त्याचसोबत आपल्या विभागाने निधी दिलेल्या कामाचे श्रेय मात्र बावनकुळे आणि विदर्भातील नेत्यांना मिळत आहे. त्यामुळे श्रेयवाद कसा करायचा हे आपण शिकलो, असाही टोला शिरसाट यांनी लगावला.

नागपुरातील विधि महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्कचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच विधि महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी सर्व नेते आणि मान्यवर विधि महाविद्यालयातील एका रूममध्ये बसले होते. रूममध्ये घडलेला किस्सा संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात सांगितला.

संजय शिरसाटांनी आपल्या भाषणात थेट फडणवीसांवर लक्ष्य साधत एक मजेशीर पण बोचरा टोला लगावला. ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाआधी आम्ही बसलेल्या खोलीत आले आणि म्हणाले की, ही खोली आता पाडणार आहोत. मग मला वाटले की त्यांना आपल्यानंतर इथे दुसरे काही निर्माणच होऊ नये असे वाटतेय काय?

श्रेयवाद कसा घ्यायचा हे शिकलो
पण एवढ्यावरच शिरसाट थांबले नाहीत तर त्यांनी पुढे सांगितले, इथल्या कामासाठी माझ्या विभागानेही निधी दिला, मात्र सर्वजण बावनकुळेंचे कौतुक करत आहेत. इथे सर्व विदर्भातील नेते असून ते एकोप्याने वागले. त्यामुळे श्रेयवाद कसा घ्यायचा आपण इथे शिकलो, अशी कोपरखळी संजय शिरसाट यांनी लगावली.

शिरसाटांच्या विधानावर फडणवीसांचे स्पष्टीकरण
काही वेळाने फडणवीस भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, हो, ती खोली पाडणार आहोत, पण यामागे आकस नाही, तर नव्या इमारतीचे काम आहे. संजय शिरसाटांनी अर्धसत्य सांगितले आहे. विधि महाविद्यालयासाठी नव्या इमारतीची गरज आहे, म्हणून मी ते बोललो. या टोलेबाजीनंतर व्यासपीठावरील वातावरण काहीसे संमिश्र होते. पण पुढे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम कोणत्याही एका विभागाचे नसून सर्व विभागांच्या सहभागातून झाले असल्याचे नमूद करत परिस्थिती मवाळ करण्याचा प्रयत्न केला.

महायुतीतील श्रेयवादाचा संघर्ष पुन्हा उघड
या घटनाक्रमावरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जाहीर कार्यक्रमातच एकमेकांवर टोलेबाजी केली जात असल्यामुळे श्रेयवादाचा विषय केवळ अंतर्गत बैठकीपुरताच सीमित न राहता, तो जनतेसमोर उघडपणे येऊ लागला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR