रेणापूर : प्रतिनिधी
पावसाळा संपला तरी अतिवृष्टीचे संकट शेतक-यांची पाठ सोडताना दिसत नाही. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रेणापूर शहर आणि तालुक्यातील, खरीप पिकांबरोबरच रबी पेरणीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पुन्हा नदी नाल्यांना पूर येऊन, नदीकाठची उरली सुरली खरीप पिके व शेती अवजारे वाहून गेली आहेत. आता तरी झोपलेले सरकार जागी होईल का ? असा प्रश्न रेणापूर तालुका शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.
मोठ्या पावसानंतर मध्यंतरी पाऊस उघडला म्हणून शेतक-यांनी, मागच्या अतिवृष्टीतून वाचलेले उरले सुरले सोयाबीन व इतर खरीपाची पिके काढून त्याच्या गंजी लावल्या होत्या तर बहुतांश शेतक-यांनी रब्बीची पेरणी केली होती. मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या तर कांहींच्या पाण्यात भिजत आहेत. हरभरा, गहु व इतर रब्बीच्या पेरलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. रेणापूर गावातील सोयाबीन व इतर पिकांच्या गंजी, शेती अवजारे वाहून गेले आहेत. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिके वाया गेल्यानंतर शेतक-यांनी ही जमीन दुरुस्त करून त्या ठिकाणी हरभरा व इतर रब्बी पिकाची पेरणी केली होती.
 रात्रीच्या पावसाने शेतक-यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे या सर्व नुकसानीचे नव्याने पंचनामे करून शेतक-यांना शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे.    यावेळी ज्ञानेश्वर जगदाळे रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी अनिल फुलारी, राजन हाके, संजय इगे, अजय सुरवसे, बाळासाहेब नागराळे, बापू चव्हाण, धम्मानंद अहिरे, नर्सिंग कातळे, अजय ओ-सेकर हनुमंत सलगर, नितीन व्यवहारे, शिवराज व्यवहारे, मनोज मद्दे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

