चाकूर : प्रतिनिधी
बालाजी पाटील मित्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या २३ वर्षापासून आयोजित करण्यात येणा-या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा आजही सुरू असून यंदाचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा दि १२ मे २०२६ रोजी रोजी माझी माय मंगल कार्यालय, चाकूर येथे उत्साहात पार पडणार असून, इच्छुक वधू-वरांनी नोंदणी करावी, असे आवाहन बालाजी पाटील मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी दैनिक एकमतशी बोलताना केले आहे. सन २००३ साली बालाजी पाटील मिञ मंडळाची स्थापन करण्यात आली. तेव्हापासून आज पर्यंत बहुसंख्येने विवाह पार पडले. यात सर्वजाती धर्माती धर्मातील विवाह झाले आहेत.
हजारो लोकांच्या साक्षीने दरवर्षी विवाह सोहळा पार पडत असतो. शहरातुन वधु-वरांची वाजत-गाजत ढोल-ताशे व फटाक्यांच्या अतिषबाजीत वरात काढली जाते. नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्वागत कमानी उभारून येणा-या पाहुण्यांचे स्वागत करण्यात येते. वधु-वरांकडून आलेल्या सर्वच पाहुणे मंडळीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. शहरातील व्यापारी, शेतकरी,प्रतष्ठिति नागरिक, यांना विवाह सोहळ्यांचे निमंत्रण देण्यात येते. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा तर मिळतेच पण हा उपक्रम आज अनेक गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश या उपक्रमातून दिला जातो.
विवाह नोंदणी मोफत या विवाह सोहळ्यात सहभागासाठी वधूचे किमान वय १८ वर्षे व वराचे किमान वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. वधू-वरांनी वयाचा पुरावा आधार कार्ड, जन्म दाखला, टीसी सादर करणे आवश्यक आहे. विवाहासाठी वधू-वर व दोन्ही कुटुंबियाची पूर्ण संमती असणे आवश्यक आहे. या विवाह सोहळ्यात मोफत विवाह नोंदणी, वधू-वराचा पेहराव, मनी – मंगळसूत्र, व-हाडी भोजन, संसारोपयोगी भांडी सेट, वाजंत्रीची सोय, मंगल कार्यालय आदी सुविधा मिळणार आहेत

