लातूर : प्रतिनिधी
जिज्ञासू वृत्ती, संशोधनाची ओढ आणि परिस्थितीशी दोन हात करत पुढे जाण्याची जिद्द ही माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या बालपणापासूनच दिसून येते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षण आणि ज्ञानाचा ध्यास सोडला नाही. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर समाजाशी असलेली बांधिलकी कायम जपली. गोरगरीब वस्त्यांमध्ये जाऊन विज्ञानाची माहिती सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेत मर्यादित न राहता ते समाजाच्या विकासासाठी उपयोगी पडले पाहिजे, ही त्यांची भूमिका या ग्रंथातून स्पष्ट होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, सौम्यता आणि प्रभावी वक्तृत्वाने वाचकांच्या मनावर ठसा उमटवला. ‘सांदणवाट’ हा केवळ आत्मकथनात्मक ग्रंथ नसून तो संघर्षातून यशाकडे जाणा-या प्रवासाचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन डॉ. संग्राम मोरे यांनी केले.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर, हिंदी साहित्य परिषद, लातूर, प्रबोधन अकादमी लातूर, सम्यक विचार मंच, लातूर आणि जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्तपणे सांदणवाट या आत्मकथनावर परिसंवाद जयक्रांती महाविद्यालय, लातूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत हिोते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी स्वत: ग्रंथकार डॉ. पंडित विद्यासागर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जयक्रांती शैक्षणिक संकुलचे संस्थापक प्रा. गोविंदराव घार उपस्थित होते. मंचावर प्राचार्य डॉ. सतीश यादव, प्राचार्य डॉ. संग्राम मोरे, संध्या पंडित, डॉ. डी. एन. मोरे, कवी साहित्यिक फ. म. शहाजिंदे, प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे उपस्थित होते. यावेळी डॉ. यादव म्हणाले की, ‘सांदणवाट’ या ग्रंथातील भाषा अत्यंत साधी, सुबोध आणि सर्वसामान्य वाचकांनाही सहज समजणारी आहे.
त्यामुळे हा ग्रंथ केवळ विद्वानांसाठी मर्यादित न राहता सर्व स्तरातील वाचकांना आपलासा वाटतो. या ग्रंथात लेखकाने आपल्या जीवनातील विविध अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे मांडले आहेत. समाजातील विविध घटकांशी आलेला संपर्क, त्या अनुभवांतून मिळालेली शिकवण आणि त्या आधारे घडलेले व्यक्तिमत्त्व या सर्वांचा प्रभावी आलेख या ग्रंथात दिसून येतो. या ग्रंथातील प्रत्येक प्रसंग वाचकाला विचार करायला लावतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो. सातत्य, परिश्रम, सकारात्मक विचार आणि मूल्यनिष्ठ जीवन जगण्याचा संदेश या ग्रंथातून मिळतो.
यावेळी कवी रमेश चिल्ले, डॉ. नरसिंग वाघमोडे, डॉ अमोल लाटे,विश्वंभर इंगोले, उपप्राचार्य शिंदे, पी.आर., उपप्राचार्य डॉ. गणेश नागरगोजे, डॉ. क्रांती मोरे, डॉ. संजय मोरे, उत्तम जाधव, डॉ. सुरेश कातळे, डॉ. राठोड, डॉ. सुरेश नांदे, डॉ.आर. सी. जाधव, डॉ. शंकर यादव, डॉ. अभिजीत पत्की, डॉ. सुदाम पवार, डॉ. पांडुरंग गोरे, डॉ. फडके एस.व्ही., डॉ.गीता वाघमारे, रामदास जाधव, अमित भालके, विद्यार्थी, प्राध्यापक व साहित्यप्रेमी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी मानले.

