40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसाधू-महंतांच्या एन्ट्रीने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली

साधू-महंतांच्या एन्ट्रीने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुती व महाआघाडीत महाभारत सुरू असतानाच साधू-महंतदेखील उमेदवारीवर ठाम आहेत. राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी महंतांनी केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाची मुदत संपुष्टात आली आहे. उमेदवारांनी प्रचारालादेखील प्रारंभ केला आहे. दुसरीकडे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मतदान होऊ घातलेल्या नाशिक मतदारसंघातील उमेदवारीवरून सध्या राजकीय वातावरण तापून निघाले आहे. महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव अचानकपणे पुढे आल्याने युतीमधील खदखद बाहेर पडली आहे. तर आघाडीतून ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत विरोधाची धार अधिक वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या नाशिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. एकीकडे राजकीय पक्षांमध्ये जागेवरून मारामार सुरू असताना नाशिकमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या साधू-महंतांनीदेखील शड्डू ठोकला आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी दिली तर ठीकच आहे. अन्यथा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरू, अशी भूमिका महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, स्वामी कंठानंद महाराज व महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी घेतली आहे. या महंतांनी उमेदवारीवरच ठाम न राहता गावोगावी मतदारांच्या भेटीगाठीही घ्यायला सुरुवात केली आहे. साधू-महंतांच्या एन्ट्रीने लोकसभेची निवडणूक राजकीय पक्षांकरिता म्हणावी तशी सोपी नसणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR