परतफेडीची सवय लावा, पवार यांचा अजब सल्ला
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू, राजू शेट्टींसह अत्यंत आक्रमक पवित्रा घेत महायुती सरकारला वायदा देण्यास भाग पाडले. आता पुढील ६ महिन्यांत शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती गठित करण्यात आली. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा शेतक-यांवर बरसले. सारखंच फुकटात कसं, आता सारखी-सारखी कर्जमाफी होणार नाही. आम्ही जाहीरनामा दिला म्हणून एवढी वेळ कर्जमाफी मिळेल. तुम्हाला शून्य टक्के व्याजदराने पैसे दिले, तुम्ही कर्ज फेडा ना, असा फुकटचा सल्ला शेतक-यांना दिला. यावरून आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीच्या निकषांचा आणि अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली. आता जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण केले जाईल. परंतु अशा प्रकारची कर्जमाफी वारंवार दिली जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
सारखे फुकट, सारखे माफ, असे होणार नाही. एकदा साहेबांनी कर्जमाफी दिली. आता आम्हाला निवडून यायचे होते म्हणून आम्ही बोललो. त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतात ना, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांनी अतिवृष्टीच्या मदतीवरून बोलताना अनेक ठिकाणी नुकसान झाले असून पंचनामे वाढत आहेत. त्यामुळे ३२ हजार कोटींचा आकडा ४० हजार कोटींवर गेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आक्रमक
कर्जमाफीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार, अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतक-यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला. कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतक-यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. कर्जमाफीची आणखी योग्य वेळ कोणती असू शकते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

