जळकोट : प्रतिनिधी
देवगड-कणकवली (जि.सिंधुदुर्ग) येथील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रशिक्षणादरम्यान एका शिक्षकास कथितरीत्या ‘हरामखोर’ असे संबोधल्याच्या घटनेचा जळकोट तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधित उपविभागीय अधिका-यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जळकोट तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनास निवेदने सादर करण्यात येत आहेत.
समितीच्या निवेदनानुसार, २५ जून २०२६ रोजी देवगड येथे मतदार पुनरीक्षण प्रशिक्षण सुरू होते. सकाळी शाळेचे काम पूर्ण करून शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित झाले होते. दुपारी सलग प्रशिक्षण सुरू असल्याने भूक आणि अस्वस्थतेमुळे शिक्षक जयेंद्र चव्हाण यांनी काही वेळ विश्रांतीची विनंती केली. त्यावेळी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी संबंधित शिक्षकास कथितरीत्या ‘हरामखोर’ असे संबोधल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षक समितीने या प्रकारास शिक्षकांचा अपमान, असंवेदनशीलता आणि अमानवी वागणूक असल्याचे म्हटले आहे. आम्ही शासकीय सेवक आहोत, गुलाम नाही. शिक्षकांचा आत्मसन्मान दुखावणारे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली होती मात्र अद्याप संबंधित अधिका-यावर कोणतीही कारवाई झाली नाही तसेच संबंधित अधिका-यांनी सार्वजनिक माफीही मागितलेली नसून, आपण केलेले वक्तव्य चुकीचे नसल्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रीष्मकालीन सुट्टीत जनगणना आणि मतदारयादी पडताळणीची कामे केल्यानंतर शाळा सुरू होताच शिक्षकांवर पुन्हा एसआयआरची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असून शिक्षकांवर अतिरीक्त ताण निर्माण झाला आहे. यामुळे संबंधित अधिका-यावर तात्काळ कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी म्हणून नियुक्त शिक्षकांना एसआयआरच्या कामातून मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केली आहे. या निवेदनावर प्रकाश मरतुळे, राजू नागरगोजे, विजयकुमार तेलंग, डावखरे बी. जी., नागरगोजे आर. एस. माधव होनराव आदी पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
















