६ गावांचा संपर्क तुटला, २३३ मंडळात अतिवृष्टी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात सलग दुस-या दिवशी काही भाग वगळता जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत विभागात ६७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला असून कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे ६ गावांचा संपर्क तुटला. विभागात तब्बल २३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात गुरुवारी जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतर शुक्रवारी छ. संभाजीनगरसह काही भागांत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे बहुतांश जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. यावर्षी पहिल्यांदाच मोठा पाऊस झाला आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. किनवट तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आला. काही गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरांचे नुकसान झाले. तसेच हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून, कयाधू नदीला पूर आला. पुराचे पाणी शेत शिवारात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
माहूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मांडवा या महसूल मंडळात तब्बल २३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत म्हणजेच शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत मराठवाड्यात सरासरी ६७.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जालना ८४, बीड ४३.९, लातूर ४५.२, धाराशिव ३५.७, नांदेड ८८.६, परभणी ८९.२ आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक १०९.१ मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव, चिखली, पिंपरी, सोडेगाव, नंदापूर, कसबेधावंडा या सहा गावांचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील केळगाव, आधारवाडी, के-हाळा या गावात झालेल्या पावसामुळे केळगावकडे जाणा-या पुलावरुन पाहणी वाहत आहे. त्यामुळे तिनही गावांचा संपर्क तुटलेला आहे. सर्व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. जायकवाडी धरणात आवक कायम असून ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
















