23.8 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeराष्ट्रीय२०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारतीय मानव अंतराळात!

२०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारतीय मानव अंतराळात!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी २०२५ हे गगनयान वर्ष म्हणून जाहीर केले आहे. हे वर्ष गगनयान मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत गगनयान मिशनसाठी ७२०० चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर जवळपास ३ हजार चाचण्या अद्याप बाकी आहेत. दिवसरात्र या मिशनसाठी तयारी सुरू असून, २०२७ च्या पहिल्या तिमाहीत पहिला भारतीय अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले.

भारताची ही पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. हे मिशन यशस्वी झाले तर भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश ठरेल. मिशन गगनयानची सध्या जोरात तयारी सुरू असून, या मिशनअंतर्गत २०२७ च्या पहिल्या तिमाहीत अंतराळात मानवी उड्डाणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे चालू वर्षात दरमहा एक प्रक्षेपण निश्चित केले असल्याचेही नारायणन यांनी सांगितले. गगनयान मोहिमेला डिसेंबर २०१८ रोजी मंजुरी मिळाली होती. याद्वारे भारतीय अंतराळवीर पहिल्यांदा अंतराळात पाऊल ठेवतील. इस्रोने त्यासाठीची तयारी केली आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे भारतीय अंतराळवीराला स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे आणि सुरक्षितपणे परत आणणे हा आहे.

गगनयान मोहिमेसाठी एलव्हीएम-३ या मानवी-योग्य प्रक्षेपण यानाचा वापर केला जाणार आहे. कोलकता येथे एका कार्यक्रमात बोलताना इस्त्रो प्रमुखांनी स्पाडेक्स मिशनचे कौतुक केले. या मिशनसाठी केवळ १० किलो इंधन लागण्याची शक्यता गृहित धरण्यात आली होती. पण आता अवघ्या ५ किलो इंधनात ते पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. हे मिशन भविष्यातील अंतराळ यानांच्या डॉकिंगसाठी महत्त्वाचे आहे. स्पाडेक्स मिशनद्वारे इस्रोने कमी इंधनात यशस्वी डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले. नासा-इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार (एनआयएसएआर) उपग्रह आणि इतर व्यावसायिक व संप्रेषण उपग्रहांचे प्रक्षेपणही २०२५ मध्ये नियोजित असल्याचे नारायणन यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR