लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात लंपी रोगाच्या प्रार्दुभावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्हयात आजपर्यंत चार तालुक्यातील १२ गावांतील ४७ गोवर्गीय बाधित पशुधनापैकी १० रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. २ रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. ४७ पशुधनापैकी ३९ पशुधनांचे नमुने पशुरोग अन्वेशन औंध, पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून गोवर्गीय पशुधनात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला असून आतापर्यंत चार तालुक्यातील १२ गावांमध्ये ४७ बाधित गोवर्गीय रुग्ण नोंदवले गेले आहेत. जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने तातडीने सज्जता दाखवत शीघ्र कृती दल स्थापन केले आहे. तसेच जिल्ह्यातील १३२ व तीन फिरते पशु चिकित्सालय, पशुवैद्यकीय संस्थांना शासनाच्या मानक कार्यपद्धतीनुसार विलगीकरण, औषधोपचार, बा परोपजीवी नियंत्रण आणि डिसइन्फेक्शनबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
आपल्या गोवर्गीय पशुधनाला लंपी रोगप्रतिबंधक लस तात्काळ द्यावी. आजाराची लक्षणे (त्वचेवर गाठी, ताप, भूक मंदावणे) आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. गोठ्यांमध्ये स्वच्छता ठेवून गोचीड व माश्यांचे नियंत्रण करावे. नियंत्रण कक्ष व पशुसंवर्धन अधिका-यांशी समन्वय ठेवून दैनंदिन आजाराची माहिती द्यावी.
















