33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूर४०८ परीक्षा केंद्रांवर १० वीची परीक्षा

४०८ परीक्षा केंद्रांवर १० वीची परीक्षा

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्यावतीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा शुक्रवार दि. १ मार्च पासून घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा दि. १ ते २६ मार्च या कालावधीमध्ये पार पडणार आहे. लातूर, धाराशिव, नांदेड जिल्हयातील १ लाख ७ हजार ५२३ विद्यार्थी ४०८ केंद्रावर परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना महत्वाचे वळण देणारी परीक्षा कॉपीमुक्त व सुरळीत पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय परीक्षा मंडळाच्यावतीने शुक्रवार दि. १ मार्च पासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा सुरू होत आहे. लातूर विभागीय परीक्षा मंडळामध्ये लातूर, धाराशिव आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागातील १ लाख ७ हजार ५२३ विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा देणार आहेत.  या परीक्षेसाठी लातूर विभागाच्या वतीने ४०८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात लातूर जिल्हयातील ३८ हजार ५६२ विद्यार्थी १५२ परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. धाराशिव जिल्हयातील २२ हजार ४४१ विद्यार्थी ८९ परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत. तर नांदेड जिल्हयातील ४६ हजार ५२० विद्यार्थी १६७ परीक्षा केंद्रावर परिक्षा देणार आहेत. परीक्षा सुरूळीत पार पडावी म्हणून ५१ परिरक्षक केंद्र तयार करण्यात आले आहेत.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा  कॉपीमुक्त व सुरळीत पार पाडण्यासाठी लातूर विभागीय मंडळाच्यावतीने २१ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या बरोबरच शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, डायट, योजना आदींची पथकेही सक्रीय असणार आहेत. इयत्ता १० वी परीक्षा दि. १ ते २६ मार्च पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणीक हित लक्षात घेवून दि. २९ फेब्रुवारी पर्यत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत. परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत.  विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात १०.३० वाजता व दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी प्रमाणे परीक्षेसाठी निर्धारित वेळेनंतर शेवटी १० मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR