37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगसेमीकंडक्टरचे ३ पैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये

सेमीकंडक्टरचे ३ पैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये

मोदी सरकारची मंजुरी, १.२६ लाख कोटींचे ३ प्रकल्प, तिसरा प्रकल्प आसामला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुजरात आणि आसाममध्ये १.२६ लाख कोटी रुपयांच्या अंदाजे गुंतवणुकीसह तीन सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या प्रस्तावांना मोदी सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. येत्या १०० दिवसांत तिन्ही प्रकल्पांचे बांधकाम सुरू होणार आहे. याअंतर्गत टाटा समूह २ प्लांट उभारणार आहे तर एक प्लांट जपान आणि थायलंडच्या कंपन्या संयुक्तपणे उभारणार आहेत. ३ प्लांटच्या उभारणीमुळे देश सेमीकंडक्टर उत्पादनाच्या क्षेत्रात महत्त्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

भारताला सेमीकंडक्टरचे मोठे उत्पादन केंद्र बनवायची केंद्र सरकारची योजना आहे. यासाठी आतापर्यंत बरेच प्रयत्न केले गेले. परंतु आतापर्यंत ते यशस्वी होऊ शकले नाहीत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतात सेमीकंडक्टरचे मोठे उत्पादन होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, तीनपैकी दोन प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याने उद्योग पळविण्याचे काम केल्याचा आरोप केला जातो. कारण या अगोदरही गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बरेच प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याची उदाहरणे आहेत. त्यात सेमीकंडक्टरचाही प्रकल्प होता. आता ३ प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात २ प्रकल्प गुजरातला नेले आणि एक आसाममध्ये गेला.

इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, भारताने गेल्या दोन वर्षांत सेमीकंडक्टर क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. या कालावधीत सरकारला जागतिक चिप उत्पादकांकडून २.५० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. तिन्ही प्लांटचे बांधकाम येत्या १०० दिवसांत सुरू होणार आहे.

ढोलेरा येथे एक प्रकल्प
टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. आणि तैवानच्या पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग कॉर्पो. (पीएसएमसी) च्या भागीदारीत सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करेल. या प्लांटची स्थापना गुजरातमधील ढोलेरा येथे होणार असून, यामध्ये ९१,००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे.

साणंद येथे दुसरा प्रकल्प
सीजी पॉवर जपानच्या रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आणि थायलंडच्या स्टार्स मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स यांच्या सहकार्याने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना केली जाणार आहे. गुजरातमधील साणंद येथे हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार असून, साणंद प्लांटमध्ये ७६०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्लांटमधून २० हजार प्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

आसाममधील मोरीगाव येथे तिसरा प्रकल्प
टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड २७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आसाममधील मोरीगाव येथे सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR