जळकोट : प्रतिनिधी
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, जळकोट तालुक्यात आतापर्यंत ८ हजार ७०० शेतक-यांनी पीक विमा काढला आहे. या शेतक-यांनी सुमारे ११ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला असून, योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने उर्वरित शेतकरीही विमा भरण्यासाठी पुढे येतील का, याकडे लक्ष लागले आहे. जळकोट तालुक्यातील दोन महसूल मंडळांपैकी घोणशी मंडळात ५, ३९० शेतक-यांनी पीक विमा भरला असून ६,८९१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आला आहे तर जळकोट मंडळात ३,३३२ शेतक-यांनी (एकूण आकड्यानुसार) ४,२८४ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा घेतला आहे. अशाप्रकारे तालुक्यातील एकूण विमाधारक शेतक-यांची संख्या ८,७०० झाली आहे.
तालुक्यात यंदा सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाल्याने, पीक विम्यामध्येही सोयाबीनचा वाटा सर्वाधिक आहे. मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरविला आहे मात्र, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही जळकोट तालुक्यातील केवळ एका मंडळालाच पीक विम्याचा लाभ मिळाला होता. दुसरे मंडळ विमा लाभापासून वंचित राहिल्याने शेतक-यांमध्ये नाराजी कायम आहे. त्यामुळे यंदाही विमा भरल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळेल की नाही, याबाबत अनेक शेतकरी साशंक आहेत.
याशिवाय, गेल्या वर्षी एक रुपयात पीक विमा भरण्याची सुविधा होती मात्र यंदा शेतक-यांना स्वत:चा हिस्सा भरावा लागत असून, सोयाबीन पिकासाठी हेक्टरी सुमारे १,२५० विमा प्रीमियम भरावा लागत आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणा-या शेतक-यांवर हा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने पुढील दोन दिवसांत किती शेतकरी या योजनेचा लाभ घेतात, याकडे कृषी विभागासह शेतक-यांचेही लक्ष लागले आहे.
















