26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील प्रमुख पक्षांकडून १७ महिला निवडणूक रिंगणात

राज्यातील प्रमुख पक्षांकडून १७ महिला निवडणूक रिंगणात

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांकडून १७ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक संसदेत मंजूर झाले आहे. त्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांकडून आतापासूनच महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ८ महिला खासदार विजयी झाल्या होत्या.

यंदाच्या लोकसभेत राज्यातून विक्रमी संख्येने महिला उमेदवार विजयी होऊ शकतात. २०१९ च्या लोकसभा देशभरातून ७८ महिला निवडून आल्या होत्या. तर यंदाच्या निवडणुकीतही देशभरातून मोठ्या प्रमाणात महिलांना संधी मिळू शकते. राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने सहा तर काँग्रेसने चार, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रत्येकी दोन महिलांना संधी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एका जागेवर महिला उमेदवाराला संधी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीनेही पाच महिलांना उमेदवारीची संधी दिली आहे.

यंदाच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे. या नणंद-भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

दुसरीकडे भाजपने सहा महिलांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांना भाजपने दुस-यांदा उमेदवारी दिली आहे. बीडमधून माजी मंत्री पंकजा मुंडे, नंदुरबार मतदारसंघातून डॉ. हीना गावित या तिस-यांदा भाजपकडून नशीब आजमावत आहेत. जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ या भाजपकडून लढत आहेत, तर रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे, अमरावती मतदारसंघातून भाजपच्या वतीने खासदार नवनीत राणा या उमेदवार आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर तर पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाने यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून राजश्री पाटील, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव यांना संधी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR