26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकमी ओव्हरमध्ये जास्त रन काढणार

कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढणार

नाशिक : नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यानंतर गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांचे आभार व्यक्त केले. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून २० मे रोजी मतदान आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे सोळा दिवस शिल्लक आहेत. प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराचे धोरण काय असेल? याबाबत गोडसे यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे.

खासदार गोडसे म्हणाले, ‘प्रतिस्पर्धी उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली असली तरी, माझा मतदारसंघांमध्ये मोठा संपर्क आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे केलेली आहेत. मी देखील दोन महिन्यांपासून प्रचार करीत आहे. त्यामुळे मला फारशा अडचणी नाहीत. आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेहनत घेऊन प्रचारात झोकून देतील.

आता निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे. या कालावधीत मी कमी ओव्हरमध्ये सर्वाधिक रन काढेन, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. आगामी काळात महायुतीचे विविध नेते नाशिकच्या प्रचारात सहभागी होतील. केंद्र सरकारने केलेली कामगिरी आणि गेल्या दहा वर्षांत खासदार म्हणून केलेले काम मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या विविध नेत्यांच्या सभा होतील. या सभा वातावरण बदलून टाकतील. महायुतीच्या विजयाला अनुकूल वातावरण करतील, असेही गोडसे यांनी म्हटले.

दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच गोडसे यांनी महायुतीच्या विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. बुधवारी (१ मे) त्यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. गोडसे यांनी राज ठाकरे यांनी नाशिकला सभा घ्यावी, अशी विनंती केली आहे. त्यावर ठाकरे यांनी लवकरच त्याबाबत कळविणार असल्याचे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR