28.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeपरभणीपोक्सो कायद्यान्वये युवकास २ वर्षे सश्रम कारावास

पोक्सो कायद्यान्वये युवकास २ वर्षे सश्रम कारावास

परभणी : एका अल्पवयीन मुलीबाबत आक्षेपार्ह मजकुर लिहून फेसबुकद्वारे पोस्ट शेअर करीत बदनामी केल्याप्रकरणी आरोपी रवि वसंत वटाणे यास पोक्सो कायद्यान्वये २ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु.एम. नंदेश्‍वर यांनी ठोठावली आहे.

बामणी पोलिस ठाण्यात पिडीत मुलीने एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आरोपी रवि वटाणे याने आपणास काही कल्पना नसतांना त्याच्या मोबाईलमध्ये आपला फोटो काढला. त्या फोटोसोबत त्याचा स्वत:चा फोटो जूळवून तो फेसबुकद्वारे शेअर केला. तसेच या मुलीसोबत आपले प्रेम प्रकरण सुरु असून कोणीही तिच्याबरोबर लग्न करु नये. मुलीच्या कुटूंबियांनी तिचे माझ्यासोबत लग्न न लावून दिल्यास त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आपण जीवाचे बरेवाईट करुन घेवू, असा मजकूर लिहून आपली बदनामी केली असे पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले होते.

या तक्रारीच्या आधारे बामणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोउपनि हनुमंत नागरगोजे यांनी केला व न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. त्याआधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु.एम. नंदेश्‍वर यांनी आरोपी रवि वटाणे यास कलम १२ पोक्सो कायद्यान्वये २ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सपोनि संतोष सानप, पोउपनि सुरेश चव्हाण, पोलिस अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, मपोह वंदना आदोडे, पोह सय्यद रहीम यांनी या प्रकरणी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR