नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी) आणि दिल्ली पोलिसांनी शनिवारी संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणा-या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून ड्रग्ज बनविण्यासाठी वापरले जाणारे ५० किलो स्यूडोफेड्रिन रसायनही जप्त केले आहे.
एनसीबीने सांगितले की, अंमली पदार्थांच्या तस्करीच्या नेटवर्कचा मास्टरमाइंड तामिळ चित्रपट निर्माता म्हणून ओळखला गेला आहे. तो अद्याप फरार आहे. निर्माता आणि त्याच्या टोळीने अवघ्या ३ वर्षात सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केली आहे. मिश्र अन्न पावडर आणि वाळलेल्या नारळात लपवून हे रसायन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवले जात होते. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी खुलासा केला की अटक केलेल्या लोकांनी अंमली पदार्थ विरोधी एजन्सीला सांगितले की त्यांनी गेल्या तीन वर्षांत एकूण ४५ स्यूडोफेड्रिन शिपमेंट पाठवल्या आहेत. या शिपमेंटमध्ये अंदाजे ३,५०० किलो स्यूडोफेड्रिन होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे किंमत २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधून ड्रग्ज रॅकेटची माहिती
एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, अंमली पदार्थ विरोधी एजन्सी आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलच्या संयुक्त पथकाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या अधिका-यांच्या माहितीवरून कारवाई करून हे नेटवर्क तोडले आहे. ते म्हणाले की ४ महिन्यांपूर्वी दोन्ही देशांच्या अधिका-यांनी माहिती दिली होती की भारतातून वाळलेल्या नारळाच्या पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात लपवून स्यूडोफेड्रिन पाठवले जात आहे. ते म्हणाले की, यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनकडून माहिती मिळाली की या मालाचा स्त्रोत दिल्ली आहे.
गोदामातून ५० किलो स्युडोफेड्रिन जप्त
ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, संयुक्त टीमच्या अधिका-यांनी लिंक जोडल्या आणि १५ फेब्रुवारी रोजी पश्चिम दिल्लीतील बसई दारापुरा येथील एका गोदामावर छापा टाकला. छाप्यादरम्यान गोदामातून ५० किलो स्युडोफेड्रिन जप्त करण्यात आले. हे रसायन विविध धान्यांच्या फूड मिक्सच्या खेपेत लपवले जात होते. याप्रकरणी तामिळनाडूतील तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.
स्यूडोफेड्रिन म्हणजे काय?
स्यूडोफेड्रिन हे एक प्रकारचे रसायन आहे. ज्यापासून मेथॅम्फेटामाइन तयार केले जाते. हे एक प्रकारचे ड्रग्ज आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे. अहवालानुसार, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या ड्रग्ज किंमत १.५ कोटी रुपये प्रति किलो आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे स्यूडोफेड्रिन असेल किंवा त्याचा व्यापार केला असेल तर त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.