मुंबई : वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवात निराशाजनक झाल्यानंतरही माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाने जबरदस्त पुनरागमन केले आणि आजचा विजय त्यांचा उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणारा ठरणारा आहे. पण, या स्पर्धेत भल्याभल्यांना पाणी पाजणा-या अफगाणिस्तानने त्यांच्या गोलंदाजांना चांगले चोपून काढले. इब्राहिम झद्रानने ऐतिहासिक शतक झळकावून कांगारूंसमोर २९२ धावांचे आव्हान उभे केले.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथ आजच्या सामन्याला मुकला आहे. इब्राहिम झद्रान व रहमनुल्लाह गुरबाज यांनी पहिल्या ८ षटकांत ३८ धावांची भागीदारी केली. जोश हेझलवूडने पहिला धक्का देताना गुरबाजला (२१) झेलबाद केले. मिचेल स्टार्कने १० चेंडूंचे एक षटक या सामन्यात फेकले. झद्रान व रहमत शाह यांनी दुस-या विकेटसाठी ८३ धावा जोडून ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली होती. झद्रान या वर्षात अफगाणिस्तानकडून सर्वाधिक ७६५ धावा करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी २०१८ मध्ये वन डेत हरमत शाहने ७२२ धावा केल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेलने ऑसींना दुसरे यश मिळवून दिले. रहमन ३० धावांवर बाद झाला. झद्रान त्याचे काम चोख बजावताना दिसला अन् या वर्ल्ड कपमध्ये त्याने ३००च्या धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपच्या एका पर्वात इतक्या धावा करणारा तो पहिला अफगाणी फलंदाज ठरला आहे.
झद्रान व हशमतुल्लाह शाहिदी (२६) ५२ धावांची भागिदारी मिचेल स्टार्कने तोडली. त्यानंतर अझमतुल्लाह ओमारझाईने १८ चेंडूंत २२ धावा चोपून अफगाणिस्तानची धावसंख्या वाढवली. झम्पाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि झद्रानसह त्याची ३७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जास्त विकेट जरी मिळवत्या आल्या नसल्या तरी त्यांनी धावांच्या वेगावर अंकुश मिळवले होते. झद्रानने १३१ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अफगाणिस्तानी फलंदाजाने झळकावलेले हे पहिले शतक ठरले. २०१५मध्ये समिउल्लाह शिनवारीने स्कॉटलंडविरुद्ध केलेल्या ९६ धावा या वर्ल्ड कपमधील
अफगाणिस्तनच्या फलंदाजाची सर्वोत्तम धावसंख्या होती.
मोहम्मद नबी (१२) स्वस्तात माघारी परतल्यानंतर झद्रान व राशीद खान यांची अखेरच्या षटकांत फटकेबाजी पाहायला मिळाली. या दोघांनी २७ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी करून संघाला ५ बाद २९१ धावांचा डोंगर उभा केला. राशीदने १८ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावा चोपल्या. झद्रान १४३ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह १२९ धावांवर नाबाद राहिला.