नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशांचे पालन न केल्याबद्दल तीन बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बँकांना १० कोटी रुपयांहून अधिक दंड ठोठावला आहे. यामध्ये सिटी बँकेला सर्वाधिक पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय बँक ऑफ बडोदाला ४.३४ कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेला १ कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, पाच को-ऑपरेटिव्ह बँकांनाही दंड ठोठावण्यात आला.
खासगी क्षेत्रातील सिटी बँकेवर बँकिंग नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तसेच जोखीम व्यवस्थापन आणि वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगसाठी आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाही तर बँक ऑफ बडोदावर सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ लार्ज कॉमन एक्सपोजरच्या स्थापनेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यासोबतच चेन्नईस्थित सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक कर्ज आणि आगाऊ नियमांचे पालन न केल्याबद्दल दोषी आढळली आहे. त्यामुळे या बँकेलाही दंड ठोठावण्यात आला आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन न केल्याने या तिन्ही बँकांवर हा दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांना फटका बसणार नाही
ग्राहकांना बँकांवरील कारवाईचा फटका बसणार नाही. बँका आणि त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हा या कारवाईचा उद्देश नाही. आरबीआयने या बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये त्याला दंड टाळण्यासाठी स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.