मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात २०२५ मध्ये एकूण ४८ हजार २७८ महिल्या हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी २०२४ मध्ये ही संख्या ४५ हजार ६६२ इतकी होती. यात अल्पवयीन मुलींची संख्याही अधिक आहे. २०२५ आणि २०२४ मध्ये अनुक्रमे १२ हजार ११३ अल्पवयीन मुली आणि ११ हजार ३१६ इतक्या अल्पवयीन मुली हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हरविलेल्या एकूण महिल्यांपैकी २०२४ ला ३० हजार ८७७ आणि २०२५ मध्ये ३६ हजार ५८१ महिला मिळून आल्या आहेत. विधानसभेत लेखी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात विशेषत; मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर शहारातील अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याबाबत आमदार मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर, मनीषा चौधरी यांच्यासह अनेक आमदारांनी यासंदर्भात लेखी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात वरील माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील लेखी उत्तर दिले आहे.
मुले – मुली सापडण्याचे प्रमाण ९६ टक्के
या लेखी उत्तरानुसार राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, रायगड, नागपूर शहर आणि छत्रपती संभाजीनगर या ५ जिल्ह्यात २०२४-२०२५ रोजी एकूण ४ हजार ९८९ बालके हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ८१३ बालके मिळून आल्याची माहिती या उत्तराच्या निमित्ताने देण्यात आली आहे. या २ वर्षात १४ ते १८ वयोगटातील हरवलेल्या मुला मुलींपैकी ९६ टक्क्यांपेक्षा जास्त मुले व मुली मिळून आल्या असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले आहे.
बेपत्ता मुलांच्या शोधासाठी ऑपरेशन मुस्कान
बेपत्ता व शोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात २०१५ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण १३ ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले आहेत तर यंदाच्या वर्षात १४ ऑपरेशन मुस्कान सुरू असल्याचे या वेळी लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.

