27.3 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीय५० मुन्नाभाई बनले उपनिरीक्षक

५० मुन्नाभाई बनले उपनिरीक्षक

पेपर लीक, डमी उमेदवार टॉपर नरेश विश्नोई अटकेत

जयपूर : राजस्थानमध्ये पेपर लीक प्रकरणामध्ये ट्रेंिनग घेत असलेल्या आणखी ३५ सब इन्स्पेक्टरना पेपर लीक खटल्यात आरोपी बनविण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी टॉपर नरेश विश्नोई याला अटक करण्यात आली आहे. आता एकूण आरोपी सब इन्स्पेक्टरांची संख्या ५० वर पोहोचली आहे. एसओजीने सर्व ५० आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. ३५ नव्या आरोपींपैकी बहुतांश आरोपी हे पोलिस ट्रेनिंग सेंटरमधून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. काल ताब्यात घेण्यात आलेल्या १५ पैकी १३ आरोपीना अटक करण्यात आली आहे. आता सरकार त्यांना बरखास्त करणार आहे.

राजस्थान पेपर लीक प्रकरणामध्ये एका तपास अधिका-याने सांगितले की, भरती परीक्षेमध्ये टॉप करणा-या एका व्यक्तीसह १५ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना लीक झालेल्या प्रश्नपत्रिका आणि डमी उमेदवारांचा उपयोग करून परीक्षा पास झाल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी)च्या एका पथकाने राजस्थान पोलिस अकादमीमध्ये पोहोचली. तसेच तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अधिका-याने सांगितले की, एका उपनिरीक्षकाला अजमेरमधील किशनगड येथील पोलिस प्रशिक्षण संस्थेतून आणि इतर दोघांना त्यांच्या गावातून ताब्यात घेतले.

पेपर लीकमागे गुन्हेगारी टोळी
राज्य पोलिसांच्या एटीएस आणि एसओजीचे एडीजी व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, राजस्थान लोकसेवा आयोगाने २०२१ मध्ये सब इन्स्पेक्टर आणि प्लाटून कमांडर भरती परीक्षा आयोजित केली होती. दरम्यान, एका गुन्हेगारी टोळीने या परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केली होती. तसेच काही उमेदवारांची भरतीही घडवून आणली होती. तपासामध्ये ही बाब समोर आली होती, त्यानंतर एफआयआर नोंदवली. त्यानंतर संशयित १५ प्रशिक्षणार्थी सब इन्स्पेक्टरना ताब्यात घेण्यात आले.

चौकशी सुरू
आता त्यांना अधिक चौकशीसाठी एसओजी मुख्यालयात आणण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका मिळवण्याशिवाय काही परीक्षार्थींसाठी डमी उमेदवारांची व्यवस्थाही करण्यात आली असावी, असा तपास यंत्रणांना संशय आहे. ज्यांच्यामध्ये स्वत: परीक्षा देण्याची योग्यता नव्हती अशा व्यक्तींसाठी ही व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR