नवी दिल्ली : वृत्तसंस्था
समोर आलेल्या कामात स्वत:ला पूर्ण झोकून देणे हे चांगलेच असते. त्यामुळे बॉस आणि सहका-यांकडून कौतुकही मिळते. मात्र, सतत बौद्धिक काम केल्याने भावनिक आणि मानसिक क्षमतांवर नकारात्मक परिणाम होत आहे. शिवाय जास्त काम केल्याने मेंदूची रचना बदलतेय, असे दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.
अभ्यासात ११० कर्मचा-यांमध्ये जास्त कामाचे परिणाम पाहिले गेले. यात ७८ जणांनी ठरलेल्या तासांनुसार, तर ३२ जणांनी जास्त काम केले होते.
हे संशोधन ऑक्युपेशनल अँड एन्व्हायर्नमेंटल मेडिसीन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधकांनी व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य धोरणाच्या गरजेवर भर दिला आहे. तज्ज्ञ रूथ विल्किन्सन यांनी म्हटले की, खूप वेळ काम करण्याच्या ‘साथीच्या आजाराला’ दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. सध्याच्या डिजिटल युगात नेहमी ड्यूटीवर उपलब्ध राहिल्याने सामान्य कामाच्या वेळेचा अधिकार हिरावून घेतला जातो आहे.