अलास्का : समुद्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अथांग सागरात चुकूनही काही अघटीत घडले की शेकडो फूट खोल असलेले पाणी सगळ्यांनाच गिळून घेते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मॉर्निंग मिडास नावाच्या एका मालवाहू जहाजाला थेट जलसमाधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या कार्गो जहाजात तब्बल ३००० कार होत्या. या सर्व कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मॉर्निंग मिडास नावाच्या कार्गो शिपला आठवडाभरापूर्वी भर समुद्रात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे जलवाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या जहाजावर तब्बल ३००० नव्याको-या कारची वाहतूक केली जात होती. या कारमध्ये ७० इलेक्ट्रिक व्हेइकल, ६८० हायब्रिड कार होत्या. मिळालेल्या माहितीनुसार हे महाकाय जहाज चीनहून निघाले होते. ते मेक्सिकोला जात होते. मात्र मध्येच प्रशांत महासागरात असतानाच या जहाजाला अचानक आग लागली. ही आग विझविण्याचा प्रयत्न केला जात होता. पण ती विझविण्यात यश आले नाही. परिणामी हे आता समुद्रात बुडून गेले आहे. ही दुर्घटना अलास्का येथे अलेउतियन द्वीप समुहाजावळ घडली आहे.
आग कशी लागली, जहाज कसे बुडाले?
मॉर्निंग मिडास हे व्यापारी जहाज मेक्सिकोला जात होते. मात्र ३ जून रोजी या जहाजाला आग लागली. हे जहाज अडाक आयलंडच्या जवळपास ४९० किमी दूर होते. त्यावेळीच या जहाजाला आग लागली होती. ही आग एवढ्या वेगाने पसरली की तिला पूर्णपणे विझविता आले नाही. आगीचा भडका उडाल्यामुळे ते पुर्णपणे निष्क्रिय झाले. परिणामी आग लागल्याच्या काही दिवसांनंतर हवामान खराब झाल्याने आणि जहाजात पाणी शिरल्याने ते समुद्राच्या पाण्यात बुडून गेले. मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज ५००० मीटर खोल समुद्रात बुडाले आहे.
२२ क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश
या मालवाहू जहाजाला आग लागल्यानंतर जहाजातील क्रू मेंबर्सना वाचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. या मोहिमेत एकूण २२ क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आले. जवळून जाणा-या एका व्यापारी जहाजाने त्यांना सुरक्षितपणे वर काढले. दरम्यान, हे जहाज तब्बल ६०० फूट लांब होते. या जहाजाची निर्मिती २००६ साली करण्यात आली होती. लायबेरिया येथे या जहाजाची नोंद आहे. २६ जून रोजी हे जहाज चीनमधील यांतई बंदराहून निघाले होते. मेक्सिको येथील बंदरावर जाऊन हे जहाज थांबणार होते. मात्र तिथे पोहोचण्याआधीच या जहाजाला भर समुद्रात आग लागली आणि ते बुडाले.